पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा:एक लाख नागरिक उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न, ड्रोन कॅमेरे वापरास बंदी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोलापूर येथे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी होणार असून पुण्यात त्याच दिवशी सायंकाळी पुण्यात पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी पुण्यातील टिळक रस्ता येथील स.पा.महाविद्यालय मैदान येथे साडेचार वाजता होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरपीआय प्रमुख रामदास आठवले ,देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे असे मत भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष दीपक मानकर, गणेश बीडकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, आरपीआय पदाधिकारी ऍड . मंदार जोशी, पुष्कर तुळजापूरकर, अमोल कविटकर, हेमंत लेले उपस्थित होते. धीरज घाटे म्हणाले, महायुती म्हणून घटक पक्ष जोमाने कामास लागलो आहे. सभेसाठी संघटनात्मक रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मध्ये रविवारी किमान २० हजार मतदार पर्यंत सभा निमंत्रण देणार आहे. पुण्यात पुढील दोन दिवसात दीड लाख घरात आम्ही पोहचणार आहे. महायुती मधील पक्षांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक झाली आहे. एक एक विधानसभा मतदारसंघातून किमान पाच हजार नागरिक येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मोठ्या प्रमाणात शहरात चांगेल वातावरण कार्यकर्ते माध्यमातून करण्यात येत आहे. मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मैदान पूर्ण भरून सभेसाठी अतिरिक्त तयारी करण्यात येत आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेत येणार आहे. सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येणार असून त्यांच्या सभेतून वेगळा संदेश नेहमी दिला जातो त्यामुळे त्याचा परिणाम राज्यात दिसून येईल. त्यासोबत मतदान टक्केवारी देखील वाढणार आहे. पंतप्रधानांची सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरास बंदी लोहगाव विमानतळ ते पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधानांची सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरास बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हॉट एअर बलूनच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजकुमार शर्मा यांनी दिला आहे.पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभा, तसेच पंतप्रधानांचा ताफ ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल, लॉज, तसेच संशयितांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

  

Share