दारुबंदी नको असलेला उमेदवार आम्हालाही नको:गडचिरोली जिल्ह्यातील 309 गावांमध्ये ठराव पारित

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून उमेदवारांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे जिल्हाभरातील एकूण ३०९ गावांमध्ये मुक्तिपथ व शक्तिपथ गाव संघटनेच्या नेतृत्वात मतदारांनी ठराव घेत आपला नेता दारूबंदीचा समर्थक असावा. ज्याला दारुबंदी नको, तो उमेदवार आम्हाला नको असा निर्णय घेतला आहे. मागील ३१ वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी टिकून आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला-पुरुषांनी विशेष परिश्रम घेतले आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे प्रलोभन घालून मत मागणाऱ्या उमेदवारांमुळे विकासाला खीळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूबंदीचे समर्थन करणारा उमेदवार असल्यास गावाची किंबहुना जिल्ह्याची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात दारू नसेल तर भांडणे शक्यतो होत नाही, शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. त्यामुळे उमेदवारांकडून दारूचे वाटप होऊ नये यासाठी मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये ठराव घेऊन आपला उमेदवार कसा असावा, मतदारांचे कर्तव्य आदी बाबी पटवून दिल्या जात आहेत. निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराला आम्हाला द्यावे लागेल. वचन न देणाऱ्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पूर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप करू नये. निवडणूक शांततेत पार पाडावी, दारू वाटप करणाऱ्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जावू नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. इत्यादि विविध मुद्दे चर्चा करून ठरावात घेण्यात आले. यानुसार दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही मत देणार असा ठराव मतदारांनी घेतला आहे.

  

Share