संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार:पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत, नितीन राऊतांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

परभणी शहरात आणि जिल्ह्यात पुकारलेल्या बंददरम्यान संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार घडला असून पोलीस यंत्रणा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबवावी, अशी मागणीही केली. यावेळी डॉ.राऊत म्हणाले की, भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करणाऱ्यांची कसून चौकशी करावी, त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासावे जेणेकरून या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे? हे समोर येईल. बंददरम्यान झालेली जाळपोळ, दगडफेक हे प्रकार घडायला नको होते. मात्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कार्यरत असतानाही केवळ जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या गाफीलपणामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी डॉ.राऊत यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आंबेडकरी कार्यकर्त्यांना लक्ष्य हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ९ एफआयआर दाखल केले असून ५२ जणांवर कारवाई केली आहे. ४०० जणांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविला आहे. हिंसाचार करणारे तोंड बांधून आले होते, ते कुठले होते, याचाही शोध घ्यावा आणि निरपराध व्यक्तींवर कारवाई करून निर्माण केली जात असलेली दहशत थांबवावी. एका युवकाला ४ ते ५ पोलिस घरावर जाऊन मारहाण करीत असल्याचा व्हिडीओही डॉ. राऊत यांनी मोबाईलवर पत्रकारांना दाखवला. आंबेडकरी कार्यकर्त्यांना यात लक्ष्य केले जात असल्याचाही आरोप डॉ. राऊत यांनी केला.

  

Share