प्रचाराचा स्तर घसरला:चेहऱ्या-चेहऱ्यांचा चक्रव्यूह, शरद पवारांच्या चेहऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून युती संकटात

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजशी धार चढत आहे, तसतसा टीकेचा स्तर खूपच घसरत चालला आहे. राज्यासमोरील प्रमुख समस्या व गंभीर मुद्दे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पुुढारी प्रतिस्पर्धी नेत्यांच्या चेहऱ्यांना टार्गेट करण्यातच धन्यता मानत आहेत. यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागले आहे. राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणारे रयत क्रांती संघटनेचे नेते व भाजपच्या कोट्यातील विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांनी खोत यांचा समाचार तर घेतलाच, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फोन करून त्यांना झापून काढले. त्यामुळे नरमलेल्या खाेत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, संजय राऊत यांनी खोत यांचा कुत्रा म्हणून उल्लेख केला. त्याला उत्तर देताना खोत यांनी राऊत यांचा उल्लेख मविआचे डुक्कर असा केला. डुकराला कितीही साबण लावले तरी ते गटारातच जाते, असे म्हणून हिणवले.
कुणाच्या व्यंगावर बोलायचे नव्हते, मी शब्द मागे घेतो : सदाभाऊ खोत
वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून सदाभाऊ खोत म्हणाले, ’मी बोललेली भाषा ही गावगाड्याची आहे. ती मातीशी नाळ असलेल्यांना समजते. कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा अजिबात हेतू नव्हता. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.’ खोतांची विनाशकाले विपरीत बुद्धी, असे प्रकार बंद करा : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोत यांना फोन करून झापले. ‘तुमचे हे वक्तव्य अजिबात आम्हाला आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा. अशा पद्धतीने वैयक्तिक कुणाबद्दल बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एका नेत्याने दुसऱ्या नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. हा निंदनीय प्रकार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी.. हा त्यातला हा प्रकार आहे. नेते इतके घसरले की कुत्रे-मांजरही शरमले
विधानसभेच्या प्रचारात चारित्र्यहननाचा व्हायरस आता शिरू लागलाय. टीकेची झोड उठवताना नेतेमंडळी एकमेकांना कुत्र्या- मांजराची उपमा देऊ लागल्याने या मुक्या प्राण्यांना लाज वाटू लागलीय. सदा खाेतांंनी शरद पवारांबाबत केलेले वक्तव्य महायुतीच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. हा धोका लक्षात घेऊन अजित पवारांनी तत्काळ त्यांना ‘डोस’ देऊन उपचार केलाय. लोकसभेवेळी पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणत हिणवणाऱ्या मोदींच्या दौऱ्यापूर्वी हा वाद उद‌्भवल्याने ते तरी सावध झाले असतील, अशी अपेक्षा आहे. अमित शाहही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर हे दोन्ही सर्वोच्च नेते महाराष्ट्राला काय कानमंत्र देतात, याबाबत उत्सुकता आहे. अॅनालिसिस शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने महायुतीला नुकसान होईल का?
लोकसभेवेळी माेदींनी पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हटले होतेे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात जनमत तयार झाले होते. आताही खोत यांच्यामुळे महायुतीविरुद्ध रोष होऊ शकतो. अजित पवारांच्या त्वरित हस्तक्षेपाचे कारण?
लोकसभेवेळी शरद पवारांवर मोदी, चंद्रकांत पाटील यांनी जी खालच्या भाषेत टीका केली त्यामुळे बारामतीत अजित पवारांना फटका बसला. त्याची पुनरावृत्ती नको म्हणून काळजी. खोत यांच्या टीकेचा स्तर घसरण्याचे कारण?
सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा साखरसम्राटांशी लढा सुरू आहे. या सम्राटांचे नेते शरद पवार, त्यामुळे खोत आजवर शरद पवार यांच्याविरोधातच राजकारण करत आले आहेत. या टीकेमुळे पवारांना सहानुभूती मिळेल?
स्वत: पवार याबद्दल काहीच बोलणार नाहीत. मात्र आघाडीचे नेते युतीला धारेवर धरून पवारांप्रति जनतेत सहानुभूती निर्माण करू शकतील. त्याचा पवारांना फायदाच होईल.

  

Share