महिलेचा खून करून मृतदेह पलंगातील कप्यात लपवला:पती घरी आल्यावर घटना उघडकीस आली, आरोपीचा शोध सुरू

कारचालक पती गावी गेल्यानंतर घरात एकट्या राहत असलेल्या महिलेचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे. सदर महिलेच्या खुनामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक काॅलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी,पुणे ) असे खून झालेल्या मयत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली यांचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात ठेवल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. स्वप्नाली यांचे पती उमेश कारचालक असून ते शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बीडला प्रवासी घेऊन गेले होते. त्यानंतर रात्री ते घरी परतले. त्यावेळी घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. परंतु, तिचा ठावठिकाणा मिळाला नाही. तसेच घरातील दागिने, रोख रक्कम, पत्नीचा मोबाइल शोधण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. दागिने, रोकड पलंगात ठेवली का ? हे पाहण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. त्यावेळी पत्नीचा मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्याा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.पोलिसांनी घटनास्थळी अंगुली मुद्रा तज्ज्ञ, तसेच श्वान पथकाला पाचारण केले. स्वप्नाली यांच्या खुनामागच नेमके कारण स्पष्ट झाले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना धक्काबुक्की करणारा अटकेत अपघाताची माहिती नियंत्रण कक्षाला देणाऱ्या एकाने पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक केली.सनी लांबा (वय ४०, रा. राममूर्ती काॅम्प्लेक्स, औंध रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी हरिभाऊ लोहकरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी लोहकरे आणि सहकारी खडकी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी लांबाने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन अपघाताची माहिती दिली. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी लोहकरे आणि सहकारी तेथे गेले. तेव्हा लांबा अर्धवट माहिती देत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा लांबाने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ पुढील तपास करत आहेत.

  

Share