तुरीच्या शेंगांचे भाव पोहोचले शंभरावर:आमटी, झुणका, घोळणा बनवण्यासाठी गृहिणींना भाव उतरण्याची प्रतीक्षा

तुरीच्या शेंगा निघाल्या की, जिल्ह्यात सोले-वांग्याची भाजी हा बेत ठरलेलाच आहे. सर्वप्रथम सोले वांगे केल्यानंतरच मग इतर पदार्थ तुरीच्या ओल्या दाण्यांपासून तयार केले जातात. परंतु, डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असला तरी चिल्लर बाजारात तुरीच्या शेंगा ९० ते १०० रु. किलो दराने मिळत असल्याने गृहिणींनी तुरीच्या शेंगा खरेदी करण्याचा मोह आवरला आहे. अजूनही बाजारात हव्या त्या प्रमाणात उत्तम दर्जाच्या तुरीच्या शेंगांची आवक होत नसल्याने सध्या तुरीचे भाव तेजीत असल्याची माहिती विक्रेत्यांद्वारे देण्यात आली. ग्रामीण भागात तसेच ज्यांच्या घरी शेतात तुरीची लागवड केली आहे, त्यांच्याकडे दररोज तुरीच्या दाण्यापासून विविध पदार्थ तयार केले जात आहेत. परंतु, शहरात तसेच ज्यांच्याकडे तुरीच्या शेंगा सहज उपलब्ध नाहीत, अशांना मात्र, १०० रु. किलो हा भाव बघून त्या खरेदी करायच्या की नाही, असा विचार करावा लागत आहे. कोणताही खाद्य पदार्थ बनवण्यासाठी किमान १ किलो तुरीच्या शेंगा हव्यात. कारण, त्यात काही किड लागलेले दाणे असतात. शेंगांची आवक कमी ^सध्या तुरीच्या शेंगांची आवक बाजारात कमी आहे. त्यामुळे भाव उतरले नाहीत. अनेक ठिकाणी तुरीची तोड व्हायची असल्याने भाव ८० ते १०० रु. किलो आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भाव कमी होऊ शकतात. -शेख मोहंमद, विक्रेता.

  

Share