समंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता:रवी रणांना मंत्रिपद न मिळाल्याने नवनीत राणा नाराज! व्हिडिओ शेअर करत केल्या भावना व्यक्त

नागपूर येथे महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची शपथविधी संपन्न होत असताना ज्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ज्या आमदारांना मंत्रिपद मिळाले त्यांच्या मतदारसंघात मात्र जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने व्हिडिओ बनवत नाराजी व्यक्त केली आहे. जिंदगी है.. समंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता.. पाणी बनकर ऑंखो में आ भी नहीं सकता, अशा ओळी म्हणत नवनीत राणा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स या अकाऊंटवर देखील अपलोड केले आहे. त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज होत भोंडेकर यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आरपीआयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. आठवले म्हणाले, जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझे बोलणे झाले होते. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सांगितले होते. आता मी दोन दिवसांत पुन्हा दिल्लीत जाणार आहे. तेव्हा त्यांच्याशी पुन्हा या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  

Share