सनातनने धर्माचा प्रसारच केला नाही, तर प्रतिकार करणारा समाज घडवला:आता भारताला हिंदू राष्ट्र साकार करण्याची वेळ आली

सनातन संस्थेचे वाढणारे कार्य पाहाता, आता हे कार्य थांबणार नाही, उलट उत्तरोत्तर ते वाढतच जाईल. एक दिवस हिंदू राष्ट्र स्थापनेचे ध्येय साकार करील, याची ग्वाही मिळते. सनातन संस्थेचे २५ वर्षांचे कार्य पाहता हिंदू राष्ट्र साकार करण्याची वेळ आली आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठीचा हा शंखनाद आहे. कितीही उदात्त विचार असले, तरी शक्ती नसेल, तर ते व्यर्थ आहेत. शक्ती नसेल, तर ऱ्हास होतो. सनातन संस्थेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सनातनने २५ वर्षांत केवळ धर्माचा प्रसार केला नाही, तर प्रतिकार करणारा समाज निर्माण केला. एकेकाळी ‘सनातन’ हा शब्दही कुणी उच्चारत नव्हते. मात्र, आता अगदी राजधानी दिल्लीतही ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची मागणी होत असल्याचे प्रतिपादन बेलापूरचे भूमिपुत्र तथा राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले. सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव नुकताच पर्वरी (गोवा) येथील सुकुर पंचायत सभागृहात उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्र गो-सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, गोव्यातील आमदार चंद्रकांत शेट्ये, आ. प्रेमेंद्र शेट, आमदार उल्हास तुयेकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्मरक्षणासाठी कटिबद्ध गोवा सरकार देव, देश आणि धर्मरक्षणाच्या कार्यासाठी कटीबद्ध असून, देवाला महत्त्व दिले, तर धर्म जागृत राहिल आणि धर्म जागृत राहिला तर देश जागृत राहिल. यासाठी गोवा सरकार देव, देश आणि धर्मरक्षणाच्या कार्यासाठी कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

  

Share