दीपोत्सवातून स्नेह वृद्धिंगत करण्याचे काम होतेय- न्या. एस. व्ही. यार्लगड्डा:वकील संघाद्वारे जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात दीपोत्सव कार्यक्रम थाटात

जिल्हा वकील संघाला दीपोत्सव एक उत्तम सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. या माध्यमातून वकील संघ स्नेह वृध्दींगत करण्याचे एक चांगले कार्य सातत्याने दरवर्षी करीत असते. अमरावती वकील संघाची ही परंपरा सांस्कृतिक सौहार्दाला चालना देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा यांनी केले. वकील संघाद्वारे नुकतेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला उद््घाटक म्हणून जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विश्वास काळे उपस्थित होते. अमरावती वकील संघाला ही एक सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. याच अंतर्गत अमरावती जिल्हा बार असोसिएशन दरवर्षी दीपोत्सव हा उपक्रम थाटात साजरा करत असते. या वर्षी जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम थाटात पार पडला. वकील संघाच्या या उपक्रमाचे खूप कौतूक करताना यार्लगड्डा म्हणाले, या पद्धतीचा असा हा चांगला उपक्रम या आधी मला कुठे होताना दिसला नाही. सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी वकिलांची एक सामाजिक जबाबदारी असते. अमरावती वकील संघ ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडत असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्ज्वलनानंतर संघाचे सचिव अॅड. चंद्रसेन गुळसुंदरे यांनी केलेल्या प्रास्ताविकात वकील संघाच्या विविध कार्याची उपस्थितांना माहिती दिली. संघाचे उपाध्यक्ष अॅड. नितीन राऊत यांनी दिवाळी उत्सवाबाबत पौराणिक माहिती देऊन दिवाळी का साजरी केली जाते याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व काय यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी अॅड. मोहम्मद वसीम शेख (ग्रंथपाल सचिव), अॅड. सोनाली महात्मे, अॅड. साहू चिखले, अॅड. सारिका भोंगाडे, अॅड. विक्रम सर्वटकर, अॅड. सूरज जामटे, अॅड. गजानन गायकवाड, अॅड. मांगल्य निर्मळ आदींसह वकील संघाचे कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. ज्येष्ठ वकिलांचा सत्कार या प्रसंगी वकील संघाच्या वतीने ज्येष्ठ वकिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन एस. व्ही. यार्लगड्डा यांच्यासह कुटुंब न्यायालय न्यायाधीश आर. आर. पोंदकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

  

Share