राज्यात 103 मतदार संघात मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींचीच होणार गर्दी:प्रशासनाची डोकेदुखी वाढली, ओळखपत्रांचाही तुटवडा

राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून राज्यातील 103 मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींचीच गर्दी होणार असल्याचे चित्र दिसू लागले असून यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी ओळखपत्रांचाही तुटवडा भासणार असल्याचे लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून शासकिय मुद्रणालयातून ओळखपत्राची छपाई करून घेण्याच्या सूचना मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. राज्यात 288 विधानसभा मतदार संघात निवडणुक होत असून या निवडणुकीत सुमारे 4100 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुढील चार दिवसांत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यानुसार निवडणुक प्रशासनाने आवश्‍यक मनुष्य बळ उपलब्धता, वाहनांची व्यवस्था, मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त केले असून पोलिस बंदोबस्ताचे नियोजनही करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या ओळखीसाठी उमेदवारांकडून मतदान केंद्रावर प्रतिनिधी नियुक्तीची धावपळ सुरु झाली आहे. त्यासाठी प्रत्येक उमेवाराकडून एका बुथसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करून त्यांची यादी प्रशासनाकडे देऊन ओळखपत्र देण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडे ओळखपत्रांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात 100 मतदार संघात 16 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुक रिंगणात असून 3 मतदार संघात 31 पेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदार संघातील एका बुथवर 16 पेक्षा अधिक तर 3 ठिकाणी एका बुथवर 31 पेक्षा अधिक उमेदवार प्रतिनिधी असणार आहे. त्यामुळे मतदारांपेक्षा उमेदवार प्रतिनिधींचीच गर्दी या केंद्रावर पहावयास मिळणार आहे. उमेदवार प्रतिनिधींच्या वाढत्या संख्येमुळे ओळखपत्रांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. बहुतांश जिल्हयांतून उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी अतिरिक्त ओळखपत्रांची मागणी केली जात आहे. मात्र ओळखपत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हास्तरावरूनच नजीकच्या शासकिय मुद्रणालयाकडून छपाई करण्यास परवानगी देण्यात येत असल्योच पत्रात नमुद केले आहे. तर सदरचा खर्च निवडणुक कामकाजासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील या 103 मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधीची गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून मतदारांची गर्दी सांभाळण्यासोबतच उमेदवार प्रतिनिधींमध्येच होणारे वाद टाळण्यासाठीचे प्रयत्न प्रशासनाला करावे लागणार आहेत.

  

Share