भाजपमध्ये एकही लाडकी बहीण CM पदाच्या योग्यतेची नाही का?:सुषमा अंधारे यांचा सवाल, म्हणाल्या – 5 डिसेंबरपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित झाला नाही. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणीचा गवगवा करणाऱ्या भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेची नाही का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि राज्याची अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात, हे किती दिवस चालणार, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. आता 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. यावरूनही सुषमा अंधारे यांनी महायुतीला धारेवर धरले. काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असते आणि 48 तासांत सरकार स्थापन केले नसते, तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असे म्हटले जात होते. मग आता 5 डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी होणार असेल, तर तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर राहील? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. लाडक्या बहिणींना सत्तेत वाटा मिळणार का? आता सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री अजून ठरत नाही. भाजप ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करत आहे, त्या लाडक्या बहिणींना सत्तेमध्ये वाटा मिळणार का? असेही त्या म्हणाल्या. लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि राज्याची अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात, असे किती दिवस चालणार. भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्रिपदाच्या योग्य नाही का? असा सवालही अंधारे यांनी केला. तीन ते चार महिलांना मंत्रिपदे मिळणार
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेतच आता नव्या मंत्रिमंडळाची रचना एकनाथ शिंदे सरकारसारखीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री व 32 मंत्री असतील. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांचा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजप पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार?
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. पण राजकीय वर्तुळात भाजप ऐनवेळी मराठा कार्ड खेळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  

Share