तोंडले गावच्या इक्बाल मुजावर करतात माऊलींच्या अश्वांची सेवा:म्हणाले- सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी उत्साह असतो तोंडले गावच्या इक्बाल मुजावर करतात माऊलींच्या अश्वांची सेवा:म्हणाले- सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी उत्साह असतो

तोंडले गावच्या इक्बाल मुजावर करतात माऊलींच्या अश्वांची सेवा:म्हणाले- सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी उत्साह असतो

विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम, अमंगळ ।
कोणाही जीवाचा, न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेला माऊलींचा सोहळा गुरुवारी दुपारी तोंडले येथे दुपारी जेवणासाठी विसावला होता. घराची रंगरंगोटी, दारापुढे रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, हार, फुलं, अबीर- गुलाल आदी पूजेचे साहित्य आणण्याची लगबग सुरु होती. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व बांधण्याच्या जागेत मांडव उभारण्यात आला, त्या भोवती रांगोळीच्या पायघड्या घालण्यासाठी तोंडले (ता. माळशिरस) येथील इक्बाल मुजावर यांची धडपड सुरु होती. तोंडले येथे माऊलींच्या पालखीचा विसावा असतो. त्यावेळी येथील मुजावर कुटुंबीयांच्या घरी माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व थांबतात. सोहळ्यातील अश्वांच्या स्वागतासाठी मुजावर कुटुंबीय महिनाभरापासून प्रयत्नशील होते. तोंडले गावामध्ये पालखी दाखल होताच सोहळ्यावर फुलांचा वर्षांव करण्यात आला. सोहळ्यातील अश्व थेट मुजावरांच्या दारापुढे येऊन उभे राहिले. तुतारीचा निनाद झाला पूजेची लगबग सुरु झाली. पायावर पाणी घातले, अबीर-गुलालाची मुक्त उधळण झाली, अश्वांना हरभऱ्याची दाळ अन् गुळ भरवण्यात आला. अश्व स्वारांना ओटीचे साहित्य, श्रीफळ देण्यात आले. अश्वांना मुजावर यांनी स्वत: दारासमोरच्या मांडवात बांधले अन् त्यास वैरण, पाणी करण्यात आले. स्वार व त्यांच्या समवेत असलेल्या लोकांना जेवणाच्या पंगती मुजावरांच्या घरामध्ये बसल्या होत्या. मुजावर यांच्या घरातील दोन खोल्यांमध्ये वारकरी, सेवेकरी दुपारी विसावा घेतात. त्यांच्यासाठी मुजावर कुटुंबातील महिला स्वयंपाक करतात. यंदाच्यावर्षी जेवायला गोड पदार्थ कोणता हवाय? कोण-कोणते पदार्थ करावेत, अशी विचारणा आळंदी येथून सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी अश्वस्वार, सेवकांना संपर्क साधून विचारतात. त्यांच्या आवडीचे स्वयंपाक मुजावर कुटुंबीय करतात. या सेवेबाबत विचारले असता, मुजावर म्हणाले,“माझे वडील, त्यांच्या वडीलांनी माऊलींची सेवा केली होती. ही सेवा अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबात आहे, माझी मुलं व नातवंडे देखील या सेवेत सक्रीय आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी उत्साह, चैतन्य निर्माण होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वस्वार तुकाराम कोळी म्हणाले, तोंडले गावामध्ये मुजावर कुटुंबाच्या घरी अश्वांचे उत्साहात स्वागत करून पूजा करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून मुजारवर कुटुंबाच्या घरी ही सेवा आहे. अश्वाच्या सर्व सेवेकऱ्यांसह, सोहळ्यात तुतारी (शिंग) वाजविणाऱ्यांना मान, सन्मान करण्यात येतो.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *