गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही:शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल, धडा शिकवण्याचे केले आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा शब्दात शरद पवारांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला आहे. मंचर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, ज्यांना पद, शक्ती आणि अधिकार दिले, तेच गद्दार झाले. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा, करा, करा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. मी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली. आमदार केले, मंत्री केले. विधानसभेचं अध्यक्ष केले. मात्र त्यांनी विचाराशी गद्दारी केली आणि आमची साथ सोडली. जो गद्दारी करतो, त्याला माफी नसते. या निवडणुकीत त्यांना पराभूत करत धडा शिकवा, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले, स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला साथ दिली. ते कायम माझ्या सोबत राहिले. तसंच त्यांच्या मुलाला माझ्या सोबत काम करण्याची इच्छा होती. मला पण काम करणारी माणसं हवी होती. त्यामुळे मी दिलीप वळसे पाटलांची निवड केली आणि ते माझ्यासोबत आले. त्यांनी सर्व कामे शिकून घेतली. त्यांना मी संधी दिली, सर्व दिले. एवढे सगळे काही देऊनही या माणसाने साथ सोडण्याची भूमिका घेतली. त्यांनी आमची साथ सोडली हे लोकांना आवडले नाही, ते आज सांगत असतील की आम्ही पवारसाहेबांना मानतो तर त्यात काही तथ्य नाही.