काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आदिवासी भागांतील बिकट परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचंय, पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की आदिवासी नागरिक आजही रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमावतायत,” अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवारांनी सरकारवर केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचंय म्हणे, पण जमिनीवर आदिवासी अजूनही रुग्णालयात पोहोचण्याआधीच जीव गमावतायत! खऱ्या महाराष्ट्राचे चित्र झाकून टाकायचे आणि हे फसवे आकडे, योजना, परदेशी दौरे, गुंतवणूक परिषदा हा सगळा दिखावा करायचा, कशासाठी? असा खडा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. निष्क्रिय सरकारच्या कारभाराचा आरसा ज्यांच्या हातात मुख्यमंत्रीपद होते आणि ज्यांनी आता उपमुख्यमंत्रीपद घेतले ते एकनाथ शिंदे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्यांत गेले, तिथे आरोग्य यंत्रणांची अवस्था काय आहे, हे या व्हिडिओतून दिसते. हा केवळ व्हिडिओ नाहीतर तर निष्क्रिय महायुती सरकारच्या कारभाराचा आरसा आहे. जिथे आजही पायाला चप्पल नाही, आजारी माणूस झोळीतून रुग्णालयात जातोय आणि हे मंत्रीसाहेब मात्र हवेत उड्डाणे करतायत! महायुतीचे सहपालकमंत्री काय तर ‘पद’ घेऊन बसलेत, पण जबाबदारीपासून कोसो दूर पळतात, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओत काय? विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा आदिवासी भागातील दिसतो आहे. व्हिडिओ कच्चा, दगडगोट्यांनी भरलेला, उखडलेला रस्ता दिसत असून, आजूबाजूला घनदाट झाडी आणि डोंगराळ भाग आहे. अशा रस्त्यावरून आणि जंगलातून एका आजारी व्यक्तीला खाटेवर टाकून काही माणसे घेऊन जातान दिसत आहेत. हे दृश्य अत्यंत वेदनादायक आहे. कारण आजच्या काळात जिथे रुग्णवाहिकेसारखी मूलभूत सुविधा सहज उपलब्ध असावी अशी अपेक्षा आहे, तिथे लोकांना अजूनही रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी अशाप्रकारे खाटेचा आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारत असताना, राज्याच्या काही भागात आजही रुग्णांना झोळीतून किंवा खाटावरून रुग्णालयात न्यावे लागते. खाटावर नेली जाणारी व्यक्ती ही केवळ एक रुग्ण नाही, तर ती आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे. हे ही वाचा… पीडित महिलेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा छळ:मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा पुणे पोलिसांवर आरोप, नेमके प्रकरण काय? पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेण्यात आले, तसेच त्या महिलांवर पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ती नोंदवली नाही. दरम्यान, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. सविस्तर वाचा…