त्र्यंबकेश्वरचा प्रसाद दिल्यास गुन्हा:भक्तांच्या भावना दुखावणारा पुरातत्त्व विभागाचा हा आदेश म्हणजे औरंगजेबाचा फतवा- विश्वस्त
गुढीपाडव्यापासून दरराेज ५ हजार भाविक ज्या प्रसादाचा लाभ घेताहेत त्यावर पुरातत्व खात्याची नजर पडली. मंदिराला खेटून असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाकडे कानाडाेळा करणाऱ्या पुरातत्व खात्याला या आदेशातून बाहेरील काेणाच्या प्रसादाची ‘दुकानदारी’ सुरू ठेवायची आहे असा सवाल मंदिर विश्वस्तांसह भाविकांनी उपस्थित केला. प्रसादाची सेवा देणाऱ्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचा फतवाच पुरातत्व खात्याने काढला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्र पुरातत्वने त्र्यंबकेश्वर पाेलिस निरीक्षकांना दिले अाहे. याबाबत चाैकशी करून पुढील निर्णय घेऊ, असे नाशिकचे पाेलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. हा तर औरंगजेबाचा फतवा त्या पत्रासोबत एकही कागद जाेडलेला नाही.स्मारक अाणि मंदिरातील फरक आहे. मंदिरामध्ये प्रसाद, तीर्थ नाही मिळणार तर काय मिळणार. हे पत्र म्हणजे औरंगजेबाचाच फतवा आहे. – कैलास घुले, विश्वस्त, त्र्यंबक मंदिर प्रसाद मिळालाच पाहिजे देशभरातून येणाऱ्या भाविकांना प्रसाद मिळालाच पाहिजे. लाडू प्रसादाच्या विक्री केंद्रावरील कारवाईचा निर्णय संतापजनक आहे. भक्तांच्या आस्थेचा विषय असल्याने तातडीने निर्णय रद्द करावा – महेश मालपुरे, भाविक पुरातत्वचा फतवा : प्रसाद विक्रीवर कारवाई करा पुरातत्व स्थळ अधिनियम १९५८ च्या भाग १० व १९ नुसार देवस्थान ट्रस्टद्वारे अनधिकृत लाडू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे, ज्यामुळे संरक्षित वास्तूस धाेका, नुकसान, दुरुपयाेग हाेत आहे. त्यामुळे लाडू विक्री केंद्रावर कारवाई करा आणि ट्रस्टवर गुन्हा दाखल करा. साेमनाथमध्ये ३० वर्षांपासून प्रसाद विक्री, त्र्यंबकेश्वरच्या शिवभक्तांवरच अन्याय का?
साेमनाथचे मंदिरही पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मात्र तेथे गेल्या तीस वर्षांपासून माेहनथाळ (२०० ग्रॅ. १०० रु.), चुरमा लाडू (८० ग्रॅ. २५ रु.), दाेन प्रकारची चिक्की (२५ रु.), मगज लाडू (२५ ते २०० रु.) असा प्रसाद दिला जाताे. साेमनाथ मंदिराचे परिसर, व्हीआयपी गेस्ट हाउस, मंदिराचे प्रवेशद्वार, पार्किंग, लीलावती माहेश्वरी गेस्ट हाउस या ५ ठिकाणी या प्रसादाची विक्री सुरू आहे. भक्त महादेवाचा प्रसाद माथी लावतात,तुमचा एफआयआर पायदळी तुडवतील – प्रणव गोळवेलकर, राज्य संपादक
मंदिरात दगड पाहणाऱ्यांना देव कधीही दिसत नाही. मंदिराचे महत्त्व त्यातील दगडांमुळे नसते तर देवामुळे असते. पुरातत्त्व विभागाने मंदिराचे दगडच पाहावेत, त्र्यंबकेश्वरचे भक्त मंदिरातील देव पाहतात. त्र्यंबकेश्वर हे लाखाे भक्तांचे दैवत आहे. पुरातत्त्व विभाग जन्माला आला, त्याच्या आधीपासून, हजाराे – लाखाे वर्षांपासून…
भक्त देवाकडे येतात, प्रार्थना करतात, काही मागतात, देवाने काही द्यावे अशी अपेक्षा घेऊन येतात, नवस करतात आणि तिथला प्रसाद देवाची कृपा म्हणून घेतात, माथी लावतात अन् मगच ग्रहण करतात. प्रसादाचे एक पावित्र्य असते. प्रसाद हा कधीच व्यापार नसताे. देवासमाेर ठेवलेले पैसे किंवा प्रसादासाठी दिलेले पैसे याला कधीही व्यापार-व्यवसाय किंवा विक्री म्हणता येणार नाही. तरीही पुरातत्त्व विभागाने प्रसाद देणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध एफआयआर करा, असे पत्र पाेलिस निरीक्षकांना दिले आहे. या पत्रामुळे भक्तांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. आता पाेलिस निरीक्षक भक्तांच्या देवाकडे पाहणार की राज्याच्या ‘देवाभाऊ’कडे पाहणार हे पाहावे लागेल. बमबम भाेले म्हणणाऱ्या भक्तांच्या भावना दुखावल्या तर ते कधी ‘हर-हर महादेव’ म्हणत तांडव करतील अन् तुमचा एफआयआर पायदळी तुडवतील, हे तुम्हाला कळणारही नाही.