महाराष्ट्रात आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे युतीचे संकेत दिले होते. आता उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई आणि एमएमआरएच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर मोठे विधान केले आहे. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सर्वच जागांसाठी तयारीला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 7 पालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या 7 पालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. जिथे-जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झाल्या नाहीत, तिथे गट प्रमुखांच्या नेमणुका करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. संघटनात्मक तयारी पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच करा, कोर्टाच्या निर्णयानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत, त्याकडे विशेष लक्ष ठेवा. ज्या गोष्टी घडत आहेत, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना तसेच जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत. ठाकरे एकत्र आले तर मनपावर सत्ता नक्की- संजय राऊत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढले तर, राज्यातील अनेक महानगर पालिकेवर आमची सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील का? यावर मात्र, त्यांनी पुढचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.