चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून एका महिलेचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, खून करणारा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा असून तो पीडितेच्या शेजारील परिसरात राहतो. ही घटना राजुरा शहरातील रमाबाई नगरमध्ये 15 जून रोजी घडली. कविता रायपूरे (वय 55) या घरी एकट्याच असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. त्यावेळी त्यांचा मुलगा, जो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, ड्युटीवर गेला होता. सकाळी त्यांची विवाहित मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करत विविध शक्यतांचा विचार केला. संपत्ती, कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणतेही वैयक्तिक कारण आहे का, यासाठी 40 ते 50 लोकांची चौकशी करण्यात आली. अखेर अल्पवयीन आरोपीचा शोध लागून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेच्या घराजवळ राहणारा एक तरुण अचानक बाहेर गावी गेल्याची माहिती मिळाली. यावर संशय घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मयत कविता रायपूरे यांच्या घरात छोटे किराणा दुकान होते. आरोपीकडून सुमारे एक हजार रुपयांची उधारी बाकी होती. त्यामुळे त्यांनी पूर्वीची रक्कम न भरल्यास सिगरेट देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अल्पवयीन तरुणाने पहाटेच्या सुमारास कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करत खून केला. विशेष म्हणजे, हा खून अचानक रागात न होता, आरोपीने अगदी शांतपणे, आधीच नियोजन करून केला होता. अल्पवयीन आरोपीने खून करण्याआधी इंटरनेटवरून गुन्हा कसा करावा, याची माहिती शोधली होती. विशेष म्हणजे, आपण अल्पवयीन असल्यामुळे फारशी कठोर शिक्षा होणार नाही, याचीही माहिती त्याने ऑनलाइन मिळवली होती. पळून जाण्यासाठी त्याने हुबळीला जाण्याचा बेत आखला होता आणि तिकिटही आधीच काढून ठेवली होती. गुन्हा करण्याआधी आपल्या मोबाईलमधील ब्राऊझिंग हिस्ट्रीही डिलीट केली होती. त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने त्याने खून केला आणि हुबळीला निघून गेला. पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातून अल्पवयीन मुलांवर इंटरनेटवरून मिळणाऱ्या विकृत माहितीचा आणि त्याचा मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांचा गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.