वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण:राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर नीलेश चव्हाणला पोलिस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सहआरोपी नीलेश चव्हाण याला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आज या प्रकरणातील तिन्ही आरोपींना बावधन पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा सुनावणी झाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीनही आरोपींची एकत्रित चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पुन्हा पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने राजेंद्र आणि सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडीत पाठवत, नीलेश चव्हाणसाठी पोलिस कोठडी कायम ठेवली आहे. न्यायालयात नेमके काय घडले? सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यात नीलेश चव्हाणकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच हगवणे कुटुंबीयांचे दोन मोबाईल हे नीलेश चव्हाणकडे होते, असेही न्यायालयात सांगितले. तसेच नीलेश आणि हगवणे कुटुंबीय यांच्यात चॅट झाले असून दोघांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. याचसोबत वैष्णवीचे बाळ सुद्धा नीलेशकडे होते, त्याने त्या बाळाची हेळसांड केली आहे का? याचा तपास करायचा असून पाच दिवसांची कोठडी नीलेशला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे नीलेश चव्हाणचे वकिलांनी सांगितले की नीलेशची चौकशी पूर्ण झाली आहे. एकही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. यामुळे नीलेशला न्यायालयीन कोठडी झाली पाहिजे, अशी बाजू नीलेशच्या वकिलांनी मांडली होती. वैष्णवीने सासरच्या त्रासातून केली होती आत्महत्या वैष्णवीने सासरच्या त्रासातून वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली, असे पहिले चित्र होते. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा गंभीर संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. वैष्णवीने साडीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. तिचे वजन 71 किलो असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. त्यामुळे घरातील पंखा एवढे वजन पेलू शकतो का, याबाबतही आता तपास सुरू करण्यात आला आहे. यासाठी साडी आणि पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचप्रमाणे, सहआरोपी नीलेश चव्हाणच्या ताब्यातून जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉप देखील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. नीलेशच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद व्हिडिओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तो लॅपटॉप माझा नाही, असा दावा नीलेशने पोलिसांसमोर केला आहे. या लॅपटॉपचीही तपासणी केली जात आहे, आणि अहवाल आल्यानंतर त्यामधील माहितीचा खुलासा होणार आहे.

  

Share