बीडमध्ये वाल्मीक कराडची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असतानाच, त्याचा जवळचा सहकारी गोट्या गित्ते याचे नवनवीन प्रकार आता उघड होत आहेत. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात गोट्या गित्ते हा संशयित आरोपी असून, सध्या तो पुन्हा चर्चेत आला आहे. गोट्या गित्तेचा एक अघोरी कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो “रामनाम सत्य है” असे म्हणत रात्रीच्या वेळी घराबाहेर नैवेद्य ठेवताना दिसतो आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोट्या गित्तेचे हातात बंदूक घेतलेले काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर येत आहेत, जे आणखीच चिंतेचा विषय ठरत आहेत. या घडामोडींमुळे बीड व परळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. गोट्या गित्ते हा वाल्मीक कराडचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात “वाल्मीक अण्णा माझे दैवत” अशा आशयाच्या पोस्ट्स त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. सध्या गोट्या गित्तेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रात्रीच्या अंधारात, कोणाच्यातरी घरासमोर ‘राम नाम सत्य है’ असे उच्चारत नैवेद्य ठेवताना दिसतो. हा प्रकार तो ज्यांच्या विरोधात वैर आहे अशा व्यक्तींच्या घराबाहेर जाणीवपूर्वक करत असल्याचे बोलले जात आहे. बबन गित्तेच्या घराबाहेर नैवेद्य ठेवतानाचा व्हिडिओ? वाल्मीक कराड आणि बबन गित्ते यांच्यातील शत्रुत्व सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर गोट्या गित्तेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रात्रीच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ असे म्हणत बबन गित्तेच्या घराबाहेर नैवेद्य ठेवत असल्याचे बोलले जात आहे. बबन गित्ते हा बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी आहे, आणि अशा व्यक्तीच्या घराबाहेर अशा प्रकारची अघोरी कृती केल्यामुळे हा प्रकार केवळ वैयक्तिक वैरापुरता मर्यादित नसून, मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. कोण आहे गोट्या गित्ते? गोट्या गित्तेचे खरे नाव ज्ञानोबा मारुती गीते असून, तो वाल्मीक कराडचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी, म्हणजेच ‘राईट हँड’ असल्याचे सांगितले जाते. परळी तालुक्यातील नंदागौळ गावचा तो रहिवासी आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सराईत गुन्हेगार म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. गोट्या गित्तेवर परळी, परभणी, लातूर, बीड, पिंपरी-चिंचवड यांसह विविध भागांतील पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या 15 वर्षांपासून अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे गुन्हेगारी नेटवर्क केवळ स्थानिक मर्यादित नसून, महाराष्ट्रभर विस्तारले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी गटांना तो बंदुका पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणाऱ्या पिस्तुलांचे मूळ गोट्या गित्तेकडे असल्याचेही सांगितले जात आहे. गोट्या गित्तेकडून परळी पोलिसांचा सत्कार साधारण 6 महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला होता. यात गोट्या गित्ते हा परळी पोलिसांचा सत्कार करत असल्याचे दिसत होते. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका देखील केली होती. परळीचे पोलिस अधिकारी कुख्यात दरोडेखोर, गुंड, चोर, पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या गोट्या गित्तेकडून कोणता सत्कार घेत आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. जितेंद्र आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते, परळीचे पोलिस अधिकारी कुख्यात दरोडेखोर, गुंड, चोर, पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या गोट्या गित्तेकडून परळी पोलिस स्टेशनमध्ये कोणता सत्कार घेत आहेत? जनतेला भीती दाखवत परळी पोलिस व दरोडेखोर गोट्या एकच असल्याचे सांगत आहेत का? या पोलिस अधिकाऱ्यावर व गोट्यावर केव्हा कारवाई करणार? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला होता.