वय 40, दोन मुलांची आई; सातव्या प्रयत्नात 1000वी रँक:यूपीएससी उत्तीर्ण करत दिव्यांग कोट्यातून निसा उन्नाराजन होणार सनदी अधिकारी
चाळिसाव्या वर्षी बहुतांश लाेक यूपीएससीची तयारी साेडून देतात. परंतु केरळच्या निसा उन्नाराजन यांनी आपले स्वप्न साकार करून एक आदर्श घालून दिला. दाेन मुलींची आई, पूर्णवेळ नाेकरी करत आणि श्रवणातील दाेष असतानाही निसा यांनी २०२४ च्या केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या नागरी सेवा परीक्षेत १००० वी रँक संपादन केली. दिव्यांग श्रेणीत त्या सनदी अधिकारी बनण्यास पात्र ठरतात. सातव्या प्रयत्नात त्यांनी हे धवल यश मिळवले. निसा यांनी ३५ व्या वर्षापासून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली हाेती. त्या म्हणाल्या शिक्षण आणि ११ वर्षीय मुलगी नंदना व ७ वर्षीय थान्वीची देखभाल करणे साेपे नव्हते. कुटुंबाची मिळाली साथ निसाला साॅफ्टवेअर इंजिनिअर पती अरुणचे पूर्ण सहकार्य मिळाले. साेबतच पाेलिस विभागातून निवृत्त वडील उन्नीराजन व आई जया श्रीनेदेखील माेठ्या प्रमाणात मदत केली. निसा म्हणाल्या, मी अनेक वेळा अनुत्तीर्ण झाले. परंतु कधीही हार मानली नाही. दरवेळी काहीतरी नवीन शिकले आणि आपली रणनीती चांगली बनवली. कोट्टायमचे उपनिरीक्षक रंजित यांच्याकडून प्रेरणा, मार्गदर्शन निसा यांनी तिरुवनंतपुरमच्या एका खासगी काेचिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतले. त्यांना काेट्टायमचे उपनिरीक्षक रंजित यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली. त्यांना कर्णदाेष हाेता. तेही सनदी अधिकारी बनले. माझ्यासारखे आव्हान असूनही कुणीतरी या वाटेवरून चालले आहे याची माहिती मिळाल्यानंतर मला हिंमत आली. निसा यांनी स्वत:ला प्रेरित करण्यासाठी बायाेग्राफिक सक्सेस स्टाेरी व माेटिव्हेशनल व्हिडिओची मदत घेतली.