राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून, उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठाम पाठिंबा देणार असल्याची घोषणा खुद्द शिंदे यांनी केली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून एकत्र लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींना भेट देताना, शिंदे यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करत, त्यांना शिवशंकराची मूर्ती भेट दिली. केंद्र व राज्यातील विकासकामे, सुरक्षा, आणि प्रशासनासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर या भेटीत चर्चा झाली. शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “ही युती एनडीएच्या स्थापनेपूर्वीपासूनची असून, आता तिला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना ही भाजपाची सर्वात जुनी आणि विश्वासार्ह मित्रपक्ष आहे,” असं त्यांनी सांगितलं. “जनता काम बघते, फक्त नाव नाही” पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. शिवसेना-मनसे युतीवरून टोला लगावत शिंदे म्हणाले, जनता काम बघते, फक्त नावावर मतदान करत नाही. आम्ही लोककल्याणाच्या मार्गावर आलो आहोत, ते दहा जनपथकडे गेले. बाळासाहेबांना हे निश्चितच आवडले नसते. हिंदुत्वाचा त्यांनी अपमान केला आहे. आघाडी युती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांना स्वतःवर विश्वास नाही म्हणून दोन दगडांवर पाय ठेवतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. अमित शाह यांना शुभेच्छा देत कामगिरीचे कौतुक शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांनाही शुभेच्छा देत त्यांची कार्यशैली आणि देशहितासाठीचे निर्णय यांची स्तुती केली. “सलग 2,258 दिवस गृहमंत्री म्हणून सेवा देणारे ते पहिले नेते आहेत. त्यांनी अनुच्छेद 370 हटवून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. ऑपरेशन महादेवद्वारे दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला. नक्षलवाद संपवण्याचे काम केले. सहकार क्षेत्रात देशाची प्रगती साधण्याचा निर्धार त्यांनी घेतला आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी अमित शहांचे कौतुक केले. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीला या निवडणुकांमध्येही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘तणाव’च्या अटकळी फेटाळल्या काही लोक त्यांच्या दिल्लीतील वारंवार होणाऱ्या भेटींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मतभेद म्हणून सादर करत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांच्यात आणि फडणवीस यांच्यात कोणताही तणाव नाही आणि ते महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. दिल्ली भेटीचा उद्देश फक्त राजकीय समन्वय आणि केंद्रीय नेत्यांशी भेटी हा आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.