विठ्ठलाचा पोवाडा, VIDEO:हरहुन्नरी शाहिराची अनोखी रचना आणि सादरीकरण; सांप्रदायिक भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम विठ्ठलाचा पोवाडा, VIDEO:हरहुन्नरी शाहिराची अनोखी रचना आणि सादरीकरण; सांप्रदायिक भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम

विठ्ठलाचा पोवाडा, VIDEO:हरहुन्नरी शाहिराची अनोखी रचना आणि सादरीकरण; सांप्रदायिक भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम

आज आषाढी एकादशी, या निमित्ताने अनेक संत महात्म्यांनीही रचलेले अभंग आपण नेहमीच ऐकले किंवा गायले असतील. अभंग, किर्तन, भारूड या माध्यमातून विठ्ठल भक्तीचे अनोखे रूप आपण पाहत आलो आहोत. मात्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला पोवाडा या माध्यमातून विठ्ठलाची भक्ती सांगण्याचा प्रयत्न हा दुर्लभच म्हणावा लागेल. असाच प्रयत्न छत्रपती संभाजीनगर येथील शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी केला आहे. ‘दिव्य मराठी’ च्या वाचकांसाठी त्यांनी या पोवाड्याचे सादरीकरण देखील केले. आषाढी एकादशी निमित्ताने शाहीर अजिंक्य लिंगायत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विठ्ठल भक्तीचा महात्म्य सांगणारा हा पोवाडा सादर केला आहे. हा पोवाडा स्वतः अजिंक्य लिंगायत यांनीच रचला असून जगभरातील मराठी शाहिरांसाठी तो खुला देखील केला आहे. शाहिरी कला, परंपरा अजरामर ठेवण्यात देखील शाहीर अजिंक्य लिंगायत प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाहिरी परंपरा जपण्याचे, संवर्धनाचे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे कार्य ते करत आहेत. या पोवाड्याविषयी सांगताना ते म्हणतात की, खरंतर विठ्ठलाचे अभंग गायले जातात, गाथा सांगितली जाते, कीर्तनातून, भारुडांतून विठ्ठल भक्तीचे महात्म्य सांगितले जाते. पण संत काळात तर काही शाहिरांनी खऱ्या अर्थाने श्री विठ्ठलाचे, श्रीरामाचे, श्रीकृष्णाचे पोवाडे भेदक रूपातून गायले आहेत. तसा विठ्ठलाचा पोवाडा म्हणजे जरा दुर्लभच विषय….म्हणून सर्वसामान्यांसाठी विठ्ठल भक्तीचे, वारीचे महात्म्य सांगण्यासाठी हा भक्ती पोवाडा सुचला आणि तो विठ्ठलाच्या कृपेने लिहिला गेला. यामध्ये विठ्ठलाचे खरे असणारे रूप आणि वारकऱ्यांची प्रामाणिक, सविनय, सांप्रदायिक भक्ती आणि शक्तीचा संगम या शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विषयांवर पोवाड्याची रचना योगविद्येचा पोवाडा, प्रभू श्रीराम हिंदी पोवाडा, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पोवाडा, भारतीय नौसेना दिन पोवाडा, राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचा पोवाडा, रुबेला लसीकरण पोवाडा, शिवराज्याभिषेक गीत आदी पोवाडे देखील अजिंक्य लिंगायत यांनी रचले आहेत. शाहीर कलेतील तिसरी पिढी शाहीर अजिंक्य लिंगायत यांची कलेतील तिसरी पिढी आहे. यांचे पंजोबा स्व. काशिनाथराव तावरे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत तबलावादनासाठी साथसंगत करत होते. यानंतर यांचे आजोबा शाहीर अंबादास तावरे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून पद भूषवीत शाहिरीच्या प्रचार – प्रसार आणि प्रशिक्षणार्थ शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाची स्थापना करून नवीन कलावंत तयार व्हावा या हेतूने आयुष्यभर कार्य केले. यासोबत शाहीरांच्या वडिलांचे वडील (आजोबा) हे कुष्ठरोगाचे डॉक्टर होते, व उत्तम असा चौघडा वाजवीत होते. आणि यांच्या पुढची पिढी म्हणून शाहीर अजिंक्य लिंगायत हे नवीन लोककलावंत नवा शाहीर तयार झाला पाहिजे, या हेतूने लोककलेच्या संगोपन – संवर्धन आणि प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. प्रचार, प्रसार तसेच संवर्धनाचे कार्य शाहीर अजिंक्य हे लोककला अभ्यासक, लोककला प्रशिक्षक आणि लोककला प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यासोबतच ते छत्रपती संभाजीनगरच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमधील लोककला अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख देखील आहेत. शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाचे ते महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणूनही काम करत आहेत. भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये विविध शालेय शिक्षण संस्था, शासकीय शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वायत्त शिक्षण संस्था तसेच आवश्यक त्या ठिकाणी लोककला अध्यासन केंद्रासारखे लोककला प्रशिक्षण केंद्र, लोककला अध्यासन केंद्र, लोककला अभ्यासक्रम सुरू करून शाहिरीचे व लोककलेचे प्रचार – प्रसार – प्रशिक्षण व संगोपन – संवर्धनाचे कार्य हे करीत आहेत. विठ्ठलाचा पोवाडा सादर करण्यासाठी लाभलेली साथ संगत शाहीर अजिंक्य यांनी रचलेला विठ्ठलाचा पूर्ण पोवाडा देखील वाचा…. धन्य धन्य पंढरपुरी। उभा विटेवरी। सावळा हरी।
जगाच्या कल्याणासाठी ।
भक्तीचा वाहे पूर ओटी।
घुमला गजर संत ओठी ॥ जी ॥
सुंदर असे ते ध्यान। शोभे ते छान। मोहिले मन ।
तुळशी माळ गळा कासे पितांबर।
भक्तीचा हाची विश्वंभर ।
झुके ब्रह्मांड चरणावर ॥ जी ॥
प्रेमळ सावळी मूर्ती । संत संगती। शाहीर वर्णिती ।
ग्यानबा तुकाराम म्हणती ।
टाळ मृदुंग वाजे भोवती ।
राम कृष्ण हरी गजर गाती ॥ जी ॥
आषाढाची धन्य ही वारी। पृथ्वीतलावरी। कल्याण करी।
तुळशीची गळा घालूनी माळ।
फुगड्या दिंडीची वारकरी चाल।
हाती घेऊन एकतारी टाळ ॥ जी ॥
विठ्ठलाचा गजर चालला । सोहळा रंगला। ध्वज फडकला।
साधू संत वैष्णव मेळा जमला।
चंद्रभागेचा तीर सजला।
एकादशीच्या पर्व काळाला ॥ जी ॥
भक्त पुंडलिकाच्यासाठी। चंद्रभागेतटी। उभा कर कटी। आशीर्वाद देती।
देऊनी भक्तीची ती कास।
आत्मस्वरूपी लागली आस ।
मुक्तीचा मार्ग खरा हा खास ॥ जी ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा। पंढरीचा राणा। राहतो जना।
विठ्ठल रखुमाईच्या पायी।
शाहीर हा भक्तीगान गाई।
गुरूंची कृपा मज डोई।
आई वडिलांची पुण्याई।
राजयोगी धन्य मी होई ॥ जी ॥ जयजयकार विठू माऊलीचा । साधू संताचा। वारकऱ्यांचा ।
भक्ती सळसळते रोमारोमात ।
अजिंक्य शाहीर पोवाडा लिहितात ।
गाती शाहीर अभिमानात ।
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात || जी ||
एकादशीच्या सोहळ्याला शाहीर गरजला।
खरोखर शाहीर गरजला ।
राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय बोला ॥ जी ॥

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *