हिंगोली जिल्हयात मतदानाचा टक्का वाढल्याने भावी आमदारांची धाकधूक वाढली:सर्वात जास्त कळमनुरीत 73 टक्के मतदान, हिंगोलीत 68 टक्के

हिंगोली जिल्हयात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वसमत विधानसभा मतदार संघ वगळता इतर दोन ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याने भावी आमदारांचीही धाकधूक वाढली आहे. जिल्हयात तीन मतदार संघात सरासरी ७१.०५ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात २३, कळमनुरीत १९ तर वसमत विधानसभा मतदार संघात ११ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. बुधवारी ता. २० सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले. जिल्हयातील १०१५ मतदान केंद्रावर १८ मतदान केंद्रावर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदान झाले. यामध्ये जिल्हयात सरासरी ७१.०५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, हिंगोली विधानसभा मतदार संघात ६८.०१ टक्के मतदान झाले आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात ७३ टक्के तर वसमत विधानसभा मतदार संघात ७२.२० टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघात ७४.५२ टक्के मतदान झाले होते. तर कळमनुरीत ६९.२० टक्के व हिंगोली विधानसभा मतदार संघात ६४.१६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे कळमनुरी व हिंगोलीत मतदानाचा टक्का वाढला तर वसमतमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे भावी आमदारांची धाकधूक वाढली असून वसमतमध्ये मतदान कमी का झाले याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सध्या तरी जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघात जय पराजयाचे गणित मांडण्यास सुरवात झाली असून गावपातळीवर मिळणाऱ्या मतदानाची आकडेमोड सुरु झाली आहे. दरम्यान, तीनही ठिकाणी शनिवारी ता. २३ मतमोजणी होणार कोण विजयी होणार अन कोणाचा पराजय होणार याची उत्सूकता मतदारांना लागली आहे. तुर्तास तरी पुढील दोन दिवस मतदार संघात मतदानाची आकडेमोड होणार आहे. टक्केवारी वाढविण्यास प्रशासन यशस्वी हिंगोली जिल्हयात यावर्षी किमान ७० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी रामेश्‍वर रोडगे, अनिल माचेवाड, अभिमन्यू बोधवड यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ठरविलेले मतदानाचे उदिष्ट गाठता आले आहे.

  

Share