जमीनीच्या वादातून मित्राच्या मदतीने केला सख्या भावाचा खून:शेगाव खोडके शिवारातील घटना, गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके शिवारातील वडिलोपार्जीत जमीन आपल्यालाच मिळावी यासाठी मित्राच्या मदतीने सख्या भावाचा खून करून मृतदेह ओढ्यात खड्डा करुन पुरण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर रविवारी ता. 15 गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव खोडके येथील शिवाजी किसन खोडके (22) हा गुरुवारी ता. 12 दुपार पासून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली होती. मात्र त्याचा भाऊ हरिभाऊ किसन खोडके यानेच त्याचा खून केल्याची चर्चा गावात सुरु झाली होती. दरम्यान, शनिवारी ता.14 दुपारी त्याचा भाऊ हरिभाऊ हा गोरेगाव पोलिस ठाण्यात आला व त्याने भाऊ शिवाजी याचा मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली तसेच मृतदेह ओढ्याजवळ पुरुन टाकल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यावरून अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितीन लेनगुळे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तेथे पाहणी केली असता खड्डा दिसून आला. त्यानंतर तहसीलदार अश्‍विनकुमार माने यांच्या उपस्थितीत खड्डा उकरला असता त्यात मयत शिवाजी याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, वडिलोपार्जीत 25 एकर जमीन आपल्याचा मिळावी तसेच शिवाजी हा सतत अपमान करून बोलत असल्याने त्याला कामाच्या निमित्ताने पवन आखाडे याच्या शेतात बोलावून त्याचा खून केल्याची कबुली हरिभाऊ याने दिली. या प्रकरणी नारायण खोडके यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी हरिभाऊ खोडके, पवन आखाडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

  

Share