महिलांना शौचास बाहेर जावे लागणार नाही:कचऱ्यापासून वीज निर्माण करणार, युगेंद्र पवारांचे बारामतीकरांना आश्वासन

बारामती येथील लेंडीपट्टा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी बारामतीच्या विकासासाठी अनेक योजना आणणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. बारामती येथे साठणारा कचरा, त्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करत बारामतीकरांना वीज देणार असल्याचे देखील युगेंद्र पवार यांनी घोषित केले आहे. कचऱ्यापासून आपण वीज तयार करणार युगेंद्र पवार म्हणाले, कन्हेरीच्या शेजारीच मला रोज घरातून येताना दिसतो तिथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आपण नवीन तंत्रज्ञान आणणार, जग आता लई पुढे गेले आहे. त्या कचऱ्यापासून आपण वीज तयार करू शकतो असे कारखाने आपण बारामतीमध्ये आणणार आणि कचऱ्यापासून वीज तयार करून आपल्या लोकांना देणार. शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल, शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू. सगळ्यांची मदत घेऊन आपण हे काम करणार आहोत. शिक्षणावर तर आपण भर देत होतो, आधी पण देत होतो पुढे पण देत राहू आणि पुण्यानंतर बारामतीचे नाव शिक्षणाचे माहेरघर कसे होणार यासाठी आपण काम करणार. भारतातले पहिले एआय कॉलेज बारामतीत येणार पुढे ते म्हणाले, मराठीत कृत्रिम बुद्धी आपण म्हणतो म्हणजे एआय. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनात भारतातले पहिले एआय कॉलेज तुमच्या बारामतीमध्ये येत आहे. पहिले कृत्रिम बुद्धीमत्तेचे कॉलेज संपूर्ण देशातील दोन महिन्यात बारामतीमध्ये उद्घाटन होणार आहे. ही शरद पवारांची दूरदृष्टी आहे आणि त्यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला मिळाले हे आपले नशीब आहे, आपले भाग्य आहे. गावांमधील बंद झालेल्या एसटी पुन्हा सुरू करणार युगेंद्र पवार म्हणाले, अनेक वस्त्यांवर मी गेलो, आम्ही तरी तिथे गाड्यांनी गेलो, पवार साहेब तर तिथे सायकलवर गेले आहेत. एवढे कष्ट पवार साहेबांनी घेतले आणि आज त्या वाड्यावस्त्यांवर रस्ते नाहीत. तिथे रस्ते आपल्याला सर्वप्रथम तयार करायचे आहेत. ज्या गावांमध्ये एसटी बस जाणे बंद झाले आहे तिथल्या एसटी बस पुन्हा आपण सुरू करणार आहोत. हे सगळे मुद्दे मी जे बोलत आहे ते मला तुमच्यात फिरूनच मिळाले आहेत. जे बेघर आहेत त्यांना शासनाच्या मदतीने आपण घर मिळवून देणार आहोत. बारामतीमध्ये राहून पण महिलांना शौचालय नाही आज अनेक महिलांना शौचालय नाही. ही लाजदायक गोष्ट आहे की बारामतीमध्ये राहून पण महिलांना शौचालय नाही. आपण महिला व मुलींना विशेषतः चांगल्या पद्धतीचे शौचालय गावपातळीवर बांधून देणार आहोत. म्हणजे त्यांना बाहेर जावे लागणार नाही. हे सगळे काम आपण करणार आहोत. मुद्दे तर अनेक आहेत पण हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लोकांकडून आले आहेत. यालाच आपण शाश्वत विकास म्हणतो आणि हे पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

  

Share