पुण्यातील पिंपरी कॅम्प येथे एका कथित धर्मांतर प्रयत्नाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अमेरिकन नागरिक आणि एका भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी लोकांना येशूलाच देव मानण्यास आणि इतर कोणत्याही देवतांची पूजा न करण्यास सांगत होते. तसेच, ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख आणि समृद्धी लाभेल, असे आमिष दाखवून पिंपरी कॅम्प परिसरात धर्मांतराचा प्रयत्न करत होते. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी शेफर जाविन जेकॉब (अमेरिकन नागरिक) आणि स्टीव्हन विजय कदम या दोघांना अटक केली आहे. यासह एका 16 वर्षीय बालकाचाही यात समावेश होता, ज्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हे हिंदू धर्मातील नागरिकांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करत होते. हे आरोपी नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन येशू ख्रिस्ताविषयी माहिती देत होते आणि ख्रिश्चन धर्माची शिकवण देत होते. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले आहे. शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हे नागरिकांना ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असल्याचे पटवून देत होते. ख्रिश्चन धर्म वगळता इतर कोणताही धर्म महत्त्वाचा नाही, या विश्वात केवळ येशूच आहे आणि इतर धर्म केवळ कथा आहेत, असे ते सांगत होते. नागरिकांनी इतर देवतांना न मानता केवळ येशूलाच स्वीकारावे, असे सांगून त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न सुरू होता. धर्मांतर केल्यास सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल, असे आमिष दाखवले जात होते. तसेच, पैशांचे आमिष दाखवूनही नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात होता. काही सजग नागरिकांनी हा प्रकार लक्षात आल्यावर तात्काळ पिंपरी पोलिस ठाणे गाठले आणि सर्व माहिती दिली. यानंतर पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.