८ व्या महाआरतीनंतर हनुमान पावला अन् केणेकरांना आमदारकी:विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर आता शहर भाजपमध्ये तिसऱ्या सत्ताकेंद्राचा उदय

रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा नेता म्हणून भारतीय जनता पक्षात ओळख असलेले प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना अखेर विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांची आमदारकी केवळ १४ महिन्यांसाठी असेल. शहरात प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या महाआरतीचा धडाका सुरू केलेल्या केणेकरांना आठव्या महाआरतीनंतर हनुमान पावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तळात रंगली आहे. ते आमदार झाल्यानंतर शहर भाजप संघटनेत तिसऱ्या सत्ताकेंद्राचा उदय होणार आहे. भाजपने एका ‘मायक्रो ओबीसी’ समाजातील अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली. पक्षाच्या कामासाठी कधीही आणि केव्हाही रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणाऱ्या पदाधिकाऱ्याला संधी देऊन, काम करणाऱ्यांना पक्ष संधी देतो, हा संदेश भाजपने दिला आहे. भाजपचे विधान परिषदेतील प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत विजय मिळवला. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. या तिन्ही सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत होता. केणेकरांच्या आमदारकीचा परिणाम भाजयुमोपासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या केणेकरांना मनपाची खडान््खडा माहिती आहे. खोकडपुरा व विष्णुनगर या वाॅर्डांचे ते नगरसेवक होते. एकवेळ उपमहापौर, विविध समित्यांवर नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कामाचा त्यांना अनुभव आहे. उद्धवसेनेचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केणेकर एकाच वाॅर्डातील. दानवे भाजपमध्ये असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रथम नगरसेवक झाले. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने त्यांच्याच भात्यातील अस्त्र काढले होते. आमदारपदी संधी मिळाल्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यानंतर केणेकरांच्या रूपाने पक्षात तिसरे सत्ताकेंद्र उदयास येणार. मविआ सरकारविरोधी आंदोलनांचा धडाका केणेकर हे विरोधक असो की स्वकीय, कुणावरही टीका करतात. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपद होते. कोरोना काळात मविआ सरकारविरोधात आंदोलने केली. विधानसभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर केणेकर मराठा आंदोलकांचे लक्ष्य झाले होते. शहराध्यक्ष असताना कोरोना काळात शरद पवार यांच्या गाडीसमोर जाऊन त्यांनी निवेदन दिले होते. भाजप-शिवसेना युती असताना तत्कालीन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विरोधकांना भुरळ; पक्षप्रवेशाची ऑफर विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर केणेकरांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीची प्रतीक्षा होती. केणेकर राष्ट्रवादीत आले तर त्यांना आमदारकी देऊ, अशी आॅफर एकत्रित राष्ट्रवादी असताना पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी दिली होती. फायरब्रँड इमेजमुळे तत्कालीन मंत्र्यांनी केणेकरांच्या घरी जाऊन त्यांना शिवसेनेत येण्याची गळ घातल्याची चर्चा रंगली होती. मोदींना दिली होती ओबीसींची माहिती लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात सभा झाली. मोदींनी केणेकरांना बोलावून घेत संवाद साधला. मराठा आंदोलनाची असलेली धग आणि ओबीसी जातींमधील घडामोडींची माहिती केणेकरांनी त्यांना दिली होती. त्या सभेत मोदींचे भाषण ओबीसींमधील छोट्या जातींवर आधारित होते.