ॲड. अवलोकिता माने यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार:नाशिकच्या दर्पणकार बाळशास्त्री पत्रकार संघाने केला सन्मान

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या अध्यक्षा ॲड. अवलोकिता माने यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठित असा ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. ॲड. अवलोकिता माने कायदेतज्ज्ञ व कलाकार असून, ‘निवांत अंधमुक्त’ संस्थेसाठी, कॅन्सरग्रस्त, अपंग व विशेष मुलांसाठी, पर्यावरण, स्त्रियांचे लैंगिक आरोग्य व हक्क, सर्वांसाठी कायद्याच्या चौकटीतील समुपदेशन, दिव्यांग महिलांसाठी, तसेच रांगोळी व साक्षरतेच्या संदेशातून सामाजिक प्रबोधन करण्याचे काम त्या करीत आहेत. ॲड. माने २०१८ पासून फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये माफक दरात गरजूंसाठी वैद्यकीय सेवा पुरवली जाते. या कालावधीत महिलांसाठी सर्व प्रकारचे सहाय्य, तसेच एचआयव्ही रुग्णांचे आरोग्य व अर्थार्जन, ट्रान्सजेंडर समुदायाच्या मूलभूत हक्कांसाठी त्या कार्यरत आहेत. रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा म्हणूनही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सध्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व फॅमिली प्लॅनिंगच्या संयुक्त संकल्पनेतून भारताला ऍनिमिया मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘द चेरी ब्लॉसम प्रोजेक्ट’च्या त्या प्रमुख मार्गदर्शक आहेत. माने यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, अतिशय निस्पृह व निरपेक्षपणे केलेल्या कार्याचा गौरव माझ्या एकटीचा नसून, मला आजवर ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, मला सहकार्य केले, त्यांचाही हा सन्मान आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. हा पुरस्कार माझे आईवडील, सासूसासरे यांना समर्पित करते.