2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत काही सामने महाराष्ट्रात घ्या:रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; सर्व सुविधा असल्याचा दावा

2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत काही सामने महाराष्ट्रात घ्या:रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; सर्व सुविधा असल्याचा दावा

भारतामध्ये 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या स्पर्धेत काही सामने हे महाराष्ट्र घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि सोयी सुविधा आहेत. या स्पर्धा महाराष्ट्रात झाल्या तर जागतिक पातळीवर आपल्या राज्याचे नाव निश्चित मोठे होईल, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘2036 साली ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रामुख्याने या स्पर्धा गुजरातमधील गांधीनगर व अहमदाबादमध्ये होणार आहेत. मात्र फुटबॉलच्या काही महत्त्वाच्या मॅचेस त्यांच्या राज्यात व्हाव्यात यासाठी गोवा राज्याचे क्रीडामंत्री प्रयत्नशील आहेत हे समजल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून आपल्या महाराष्ट्रात काय कमी आहे, असे वाटते. आपल्याकडेही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम व सोयीसुविधा आहेत. त्यामुळे राज्याच्या क्रीडामंत्री व मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, केंद्र शासनाशी समन्वय साधून जास्तीजास्त क्रीडा प्रकाराचे सामने जर महाराष्ट्रात आपण घेऊ शकलो तर जागतिक पातळीवर आपल्या राज्याचे नाव निश्चित मोठे होईल.’ अहमदाबाद यजमान शहर तर भुवनेश्वर, भोपाळ, पुणे आणि मुंबईचाही समावेश भारत 2036 च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी बोली लावत आहे, ज्यामध्ये अहमदाबाद हे प्रस्तावित यजमान शहर आहे. तेथे जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा आहेत. सरकार बहु-शहरीय दृष्टिकोनाचा शोध घेत आहे, ज्यामध्ये भुवनेश्वर, भोपाळ, पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रमुख क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी भारताची वचनबद्धता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, देश आपल्या प्रयत्नांमध्ये “कोणतीही कसर सोडणार नाही”. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही खेळांचे आयोजन करण्यासाठी भारताच्या तयारीवर भर दिला आहे. त्यासाठी भारताला कतार आणि सौदी अरेबियासारख्या देशांकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत असताना, देश त्याच्या संधींबद्दल आशावादी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC)2026 पर्यंत यजमान देशाबद्दल निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment