7 हजार 500 रुपये पेन्शन, मोफत आरोग्य सुविधा द्या:ईपीएस पेन्शन धारकांचे खासदार भुमरेच्या कार्यालयासमोर मुक बैठे आंदोलन
ईपीएस पेन्शनधारकांना अत्यल्प पेन्शन मिळते. देश सेवेसाठी आयुष्य खर्च करून उतार वयात उदनिर्वाहसाठी पैसे नसल्याने लाखो पेन्शन धारकांची प्रचंड अहवेलना होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनधारकांनी रविवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर मुक बैठे आंदोलन केले. पेन्शन धारकांना ७ हजार ५०० रुपये पेन्शन मिळावे व मोफत आरोग्य सुविधा लागू कराव्यात, अशी मागणी पेन्शनर्सनी केली व मागण्यांचे निवेदन दिले. ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कमलाकर पांगरकर म्हणाले की, आयुष्याचे ३० ते ३५ वर्ष देश सेवेत काम केलेल्या ७० लाखाहून अधिक पेन्शन धारकांना अतिशय तंटपुजे म्हणजे १ हजार रुपये पेन्शन दिली जाते. यातून पेन्शनर्सनी काय करावे? कुटुंब उदानिर्वाह चालवावा की, आरोग्य खर्च भागवावा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे ते सांगतात की, आमच्या पगारातून दरमाह ४१७, ५४१, १२५० रुपये अंशदान कपात करण्यात आले होते. असे असताना ११७० रुपये पेन्शन दिले जाते. कौश्यारी समितीने ३ हजार मासिक पेन्शन व महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. त्याची दखल न घेता पेन्शनविना १ हजार रुपये महागाई भत्ता निश्चित करून लाखो पेन्शन धारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकारने केले. आंदोलनाची दखल घेतली जात नाही. २५० पेक्षा जास्त पेन्शनर्स हालाख्याचे जीवन जगत असताना मृत्यूमुखी पडले आहेत. तरी पेन्शनर्सच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. हिच मोठी शोकांतिका असल्याचे सांगून खेद व्यक्त केला. आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी ज्यांना आम्ही निवडून संसदेत पाठवले त्या खासदर भुमरेंच्या सुतगिरणी येथील कार्यालयासमोर चार तास मुक बैठे आंदोलन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या संख्येने पेन्शनर्स सहभागी झाले होते.