7 वर्षांपूर्वी मलिष्काच्या विडंबनगीताने खवळली होती शिवसेना:शिवसेनेनेही त्या गीताविरुद्ध गाणे रचूनच धमकावले होते मलिष्काला

7 वर्षांपूर्वी मलिष्काच्या विडंबनगीताने खवळली होती शिवसेना:शिवसेनेनेही त्या गीताविरुद्ध गाणे रचूनच धमकावले होते मलिष्काला

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीताने नाव वाद निर्माण झाला आहे. यामुळे शिंदेसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. सेलिब्रिटी, डाव्या विचारसरणीचे विचारवंत तसेच पत्रकारांनीही गेल्या सहा दशकांत कायमच शिवसेनेला कायम टार्गेट केले होते. त्यात सात वर्षांपूर्वी आरजे (रेडिओ जॉकी) मलिष्काने “मुंबई … तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ हे मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेवर विडंबनात्मक गाणे सादर करत भर टाकली होती. मुंबई महापालिकेची सत्ता वर्षानुवर्षे उपभोगणाऱ्या, रस्त्यांवर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्चणाऱ्या शिवसेनेला हे गाणे चांगलेच झोंबले होते. तमाम नेत्यांनी मलिष्कावर शाब्दिक हल्लाबोल केला. त्या वेळी एकत्रित शिवसेनेचे कार्यकर्ते मलिष्का ज्या रेडिओ कंपनीत काम करत होती त्या स्टुडिओची तोडफोड करतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, तेव्हा शिवसेना राज्यात भाजपसोबत सत्तेत होती. त्यामुळे शिवसेनेने तोडफोड करणे टाळून गाण्याच्या माध्यमातूनच मलिष्काला धमकावले होते. तर, उद्धव ठाकरे यांनी पाऊस जोरात पडतो, त्याला बीएमसी काय करणार, असा सवाल उपस्थित केला होता. तेव्हा मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असलेल्या भाजपने त्या वादात मलिष्काची अप्रत्यक्षपणे बाजू घेतली होती. मलिष्काने २०१७ मध्ये “मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?” हे गाणे सादर केले होते. ते गाणे मुंबईतील पावसाळ्यातील खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि मुंबई मनपाच्या कारभारावर टीका करणारे होते. ते सोशल मीडियावर खूपच गाजले होते. मुंबईतील नागरी समस्यांवर तेव्हा व्यापक चर्चा घडून आली. मलिष्काच्या गाण्यानंतर आता कुणाल कामराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. कामरावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. त्या वेळच्या एकत्रित शिवसेनेने आक्रमक आंदोलन करण्याऐवजी गाण्यातून मलिष्काला इशारा दिला होता. “येडपट मलिष्का तुला स्वत:वर भरोसा हाय काय, ऑफिसमध्ये बसून करतेस बडबड, जास्त बोलशील तर होईल गडबड, सांभाळ जरा ताेंडाचा तोल, मुंबई आणि बीएमसीबद्दल जरासं गोड बोल… असं गाणं म्हणत तत्कालीन नगरसेविका, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मलिष्काला इशाराही दिला होता. मुंबई आणि बीएमसीला बदनाम करण्याचा प्रयत्न असून मलिष्काने “बाहेरच्यांच्या’ सांगण्यावरून हे गाणे तयार केल्याचा आरोप पेडणेकरांनी केला होता. दुसरीकडे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मलिष्काच्या गाण्याला फारसे महत्त्व दिले नव्हते. “कुणीही व्हिडिओ बनवू शकतो. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुंबई महापालिका आणि शिवसेना प्रामाणिकपणे काम करते,’ असे महाडेश्वर म्हणाले होते. तर, उद्धव ठाकरे यांनी ‘काही झालं तरी महापालिका टीकेची धनी होते. पाऊस जोरात पडतो त्याला मुंबई महापालिका काय करणार?’ अशी सारवासारव केली होती. या गाण्यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेने मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराइज इमारतीमधील घरात तपासणी केली. या वेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर मनपाने मलिष्काला नोटीस बजावली. मनपा सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment