कपलिंग काढतांना इंजिन-बोगीमध्ये अडकलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू:मृतदेह 2 तास अडकून राहिला; इंजिन पुढे नेण्याऐवजी लोको पायलटने तेथून पळ काढला
बेगुसराय येथील बरौनी जंक्शन येथे रेल्वेच्या पार्सल व्हॅन आणि इंजिनमध्ये अडकल्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमरकुमार राऊत (35, रा. दलसिंगसराय) असे शंटिंग मॅनचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला. बरौनी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर 15204 लखनऊ-बरौनी एक्सप्रेस आली होती. ट्रेन शंटिंगमध्ये नेण्यासाठी इंजिन बदलावे लागले. शंटिंग मॅन अमरकुमार राऊत हे इंजिन बदलण्यासाठी इंजिन आणि बोगीमध्ये काम करत होते. ते कपलिंग काढत होते. यानंतर, शंटिंग इंजिन बसवून ट्रेनला वॉशिंग पिटमध्ये नेले जाणार होते. इंजिन मागे घेत असताना ते बोगी आणि इंजिनच्या मध्ये अडकले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्लॅटफॉर्मवर उपस्थित लोकांनी आरडाओरडा केल्यावर चालकाने इंजिन पुढे घेण्याऐवजी तेथून पळ काढला. यानंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. सध्या मृतदेह बाहेर काढून फलाटावर ठेवण्यात आला आहे. मृतदेह 2 तास अडकून राहिला होता बरौनी रेल्वे कॉलनीत राहणारे रेल्वे कर्मचारी आणि मृताचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले आहेत. सुमारे 2 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पूर्व मध्य रेल्वेच्या जीएमनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनपूर डीआरएम घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.