शनिशिंगणापूरला एकाच दिवशी दोन लाख भाविकांची हजेरी:मागील वर्षीच्या तुलनेत 40 हजार भाविकांची वाढ, पहाटेपासून सायंकाळपर्यंत गर्दी
यंदाच्या दिवाळी सुटीतला शेवटचा शनिवार असल्याने शनिशिंगणापुरात भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी केली होती. शनिवारी दिवसभरात दोन लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. मागील वर्षीच्या तुलनेत दिवाळीच्या सुटीतील शनिवारी ४० हजार अधिक भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने दिली आहे. पहाटेपासून दर्शनरांगेत सुरू राहिलेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती. शिंगणापूरकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहनाची वर्दळ वाढली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी दिवसभर तळ ठोकून असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील हे शनिवारी सकाळपासून शिंगणापूरात तळ ठोकून असल्याने वाहनांची संख्या वाढती असली तरी वाहतूक कोंडी मात्र कुठेही दिसली नाही. शिंगणापुरातील मुख्य चौकात शनिवारी पोलिस बंदोबस्तही वाढवलेला होता. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असलेल्या हजारो भाविकांना छत्रपती संभाजीनगर येथील गोरक्षनाथ जाधव व महेंद्र शिंदे या शनिभक्त कुटुंबियांच्या वतीने साडेचार क्विंटल खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. शनैश्वर देवस्थानच्या प्रसादालयात शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सलग सुट्ट्यांमुळे रविवारी सुद्धा भाविकांची अशीच गर्दी राहील, असा अंदाज आहे. शनिवारी सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे व कार्तिक मोदी, तर दुपारची आरती मुबंईचे हरविंदर सिंग, तर सायंकाळी आरती पुणे येथील कुलदीप अग्रवाल यांनी केली. गुजरात उच्च न्यायायाचे न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांनी पतीसह शनिदेवाचे दर्शन घेतले. श्री शनैश्वर देवस्थानच्या प्रसादालयात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. यंदाच्या दिवाळीत एकाच दिवशी तब्बल २ हजार भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. मध्यंतरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर दौरा केला होता. त्यांनीही कुठलाच बडेजाव व मिरवता याच प्रसादालयात महाप्रसाद घेतला होता.