शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार:पद्मभूषण के. एस. चित्रा, पद्मश्री साधना सरगम यांना जाहीर

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार:पद्मभूषण के. एस. चित्रा, पद्मश्री साधना सरगम यांना जाहीर

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे तर्फे 15व्या स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या मानकरी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण के. एस. चित्रा व पद्मश्री साधना सरगम यांना जाहीर करण्यात आला. प्रत्येकी 1 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण पुणे येथे होणार आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली आहे. सांगीतिक क्षेत्रातील नावाजलेल्या व दिग्गज, प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार दर वर्षी प्रदान करण्यात येतो. गेल्या वर्षीच्या समारोहात महिला गायिकांना पुरस्कार देण्यात अशी घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुरस्कारासाठी पार्श्वगायिका पद्मभूषण के. एस. चित्रा व पद्मश्री साधना सरगम यांची निवड करण्यात आली आहे. यंदा पुरस्कार महिला कलाकारांना देण्यात येणार असल्यामुळे पुरस्कार वितरणाचे व्यासपीठ महिलांसाठी असणार आहे. मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहानशहा मानल्या जाणाऱ्या श्रेष्ठ संगीतकार स्व. रामभाऊ कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे तर्फे 2006 पासून स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारने संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व दिग्गज कलाकारांना गौरविण्यात येत आहे. पुरस्कारप्राप्त कलाकारांविषयी.. पद्मभूषण के. एस. चित्रा : संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात के. एस. चित्रा यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायक स्व. कृष्णन नायर यांच्या त्या कन्या. प्रा. डॉ. के. ओमान कुट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीताचे शिक्षण पूर्ण केले. सिंधू भैरवी गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सहा राष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा या राज्यांनीही त्यांना सन्मानित केले आहे.चित्रा यांनी भारतीय विविध भाषांमधील 15 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. पद्मश्री साधना सरगम : गायनाचा वारसा आई निला घाणेकर यांच्याकडून मिळाला. संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे. गुरू कल्याणजी आनंदजी यांच्या मार्गदर्शनाखली पार्श्वगायनाची सुरुवात केली. तमिळ भाषेतील गाण्याकरीता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 2001 मध्ये मिळाला. उत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून साधना सरगम यांना 55व्या फिल्म फेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरविण्यात आले आहे. व्ही. शांताराम पुरस्कार, संवेदना प्रतिष्ठान, सहयोग फाऊंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment