अमित शहा म्हणजे ‘मुन्नाभाई’मधला सर्किट:370 कलम हटवून माझ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
सांगोला येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘सर्किट’ असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तसेच शहाजी बापू यांच्यावर देखील टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या वेळेस आपण एकावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी गद्दारी केली. काय झाडी, काय डोंगर म्हणत गेले तिकडे. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? आपल्याला एकच तिकीट बूक करायचे आहे 23 तारखेचे. गुवाहाटीला जाऊन मोजत बसा झाडं, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पुढे ते म्हणाले, तुम्हाला तिकडचे डोंगर माहीत आहेत, पण इथले टकमक टोक तुम्हाला माहीत नाही. निवडणुकीनंतर जनता तुम्हाला हे टकमक टोक दाखवेल, तुमच्या सत्तेचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. अमित शहा मुन्नाभाईमधले सर्किट पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही मुन्नाभाई बघितला आहे का हो? त्या मुन्नाभाईमध्ये सर्किट आहे, तसे हे अमित शहा आहेत, असे म्हणत अमित शहांना टोला लगावला आहे. अमित शहा फिरत आहेत महाराष्ट्रात, काय त्यांची ती भाषा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आणि हे काय सांगतात 370 हटवला, राम मंदिर बांधले, याचा महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना काय उपयोग आहे? हमीभाव मिळणार आहे का 370 हटवून? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. अमित शहा तुम्ही जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, हे माझ्यावर टीका करतात, 370 कलम हटवताना मी याला विरोध करणाऱ्यांसोबत होतो. अहो अमित शहा तुम्ही जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, कारण तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की 370 कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. आणि आम्ही कोणावर बसतो, काय करतो याची हेरगिरी करण्यापेक्षा एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या, जेव्हा काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित यांच्यावर हल्ले होत होते, तेव्हा मोदी आणि शहा हे नाव सुद्धा कोणाला माहीत नव्हते, तेव्हा फक्त आणि फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. 370 कलम हटवल्यानंतर तुम्ही किती काश्मिरी पंडितांना घरी घेऊन गेलात हे आधी सांगा, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राला काय पायपुसणे समजले का? इथले जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावर का नाही बोलत? मुंबई कोणाच्या घशात घालत आहेत हे तुम्हाला कळत आहे. यांचे सरकार परत आले तर तुमच्या सात बारावर आदानीचे नाव आले तर काय करणार? माझे सरकार आल्यावर मी मुंबई आदानीच्या घशात जाऊ देणार नाही. मी माझ्या भूमिपुत्रांना मुंबई आणि आसपासच्या परिसरात परवडणारे घरे देणार आहे. एक महाराष्ट्र म्हणून आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही? मोदी शहानी यायचे आणि टपल्या मारून जायचे. महाराष्ट्राला काय पायपुसणे समजले का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.