उद्धव ठाकरेंनंतर अमोल कोल्हेंच्या बॅगची तपासणी:म्हणाले – नियम फक्त विरोधी पक्षांनाच अन् सत्ताधाऱ्यांना मोकळे रान, हे मान्य नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथे तपासणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. याबाबत अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळे रान असते हे मान्य नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले. विशेष बाब म्हणजे निवडणुकीच्या काळात आपल्या बॅगची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. अमोल कोल्हे म्हणाले, आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळे रान असते हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे! उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी
निवडणूक अधिकाऱ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझ्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासण्याचेही आव्हान दिले. वणी येथील या घटनेचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः पोस्ट केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभेत या घटनेवरून मोदी – शहांसह राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. …अन्यथा गांभीर्याने विचार करावा लागेल – संजय राऊत
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांच्या तपासण्या होत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. सगळ्यांना सारखा नियम लावणार असाल, तर आमची काही हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या स्टाफला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याच वाहनांची तपासणी करण्याचे ट्रेनिंग दिले असेल, तर त्याबाबत आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल,असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. …तर प्रशासनाची निराशा होणार नाही – रोहित पवार
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमदेवार रोहित पाटील यांनीही या घटनेवरून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली आहे. प्रशासनाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलिकॉप्टर आणि विमाने तपासल्यास त्यांच्या हाती निराशा लागणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. राज्यातील तरुणांना रोजगार देऊ न शकलेले हे सरकार हेलिकॉप्टर चेक करण्याच्या निमित्ताने मध्यप्रदेशच्या कॅमेरामॅनला मात्र रोजगार देत आहे, याचा आनंद आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.