मराठाच मुख्यमंत्री होण्याबाबत आमचा संबंध नाही:आमची लढाई नेतृत्वाविरोधात – मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पाटील
विधानसभा निवडणुकीत महायुतील बहुमत मिळाले. निकाल लागून पाच दिवस लोटले तरी महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला केला नाही. अशात तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करता, त्यात आम्हाला रस नाही. आम्हाला आमच्या मागण्या कोण मान्य करेल, त्यामध्ये रस आहे. मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी मांडली आहे. काय म्हणाले विनोद पाटील?
विनोद पाटील म्हणाले, मतदान झाले आहे. निकाल लागला आहे. मुख्यमंत्री कोण व्हावे यात मराठा समाजाला रस नाही. डझनभर मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले आहेत. पण तरीही आमच्या मागण्या प्रलंबित आहेत. आमच्या मागण्या कोण मान्य करेल, यात आम्हाला रस आहे. जो पक्ष समाजहिताचे निर्णय घेत मागण्या मान्य करेल, आम्ही त्याचे स्वागत करू. परंतु वेळप्रसंगी समाजाच्या हिताआड येणाऱ्या सरकारच्या विरोधात सुद्धा लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. आमची लढाई नेतृत्वाविरोधात
विनोद पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा, हा निर्णय त्या पक्षांनी त्यांच्या सोयीप्रमाणे घ्यावा. या निवडणुकीत आम्ही मराठा म्हणून नाही, तर मतदार म्हणून सहभाग नोंदवला होता. ज्या समाजाची लोकसंख्या 32 टक्के आहे, त्याला सोडून निवडणूक होऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाने योग्य उमेदवाराला मतदान केले आहे. सरकारस्थापनेबाबत आमची कोणतीही भूमिका नाही. आमची लढाई नेतृत्वाविरोधात आहे. आजपर्यंत महाराष्ट्राला डझनापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे मिळाले होते. पण आम्हाला आरक्षण मिळाले नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. पक्षांनी मेरीट मुख्यमंत्री ठरवावा
एखादा व्यक्ती मी मराठा आहे, म्हणून मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, अशा भूमिकेशी मराठा समाज कधीही सहमत होऊ शकत नाही, अशी टीका विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आमच्या मागण्या जशास तशा प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला मुख्यमंत्री ठरवायचा असेल, त्यांनी मेरिटवर ठरवावा. एखादा मराठा आहे म्हणून त्याला मुख्यमंत्री करावे, दुसरा मराठा नाही म्हणून त्याला करू नये, या प्रक्रियेशी मराठा समाजाला देणे घेणे नाही, अशी भूमिका विनोद पाटील यांनी मांडली. सरकारविरोधात लढण्याची मराठा समाजाची तयारी आमच्यासमोर अनेक संकटे आहेत. आजही मराठी समाज नैराश्यातून जात आहे. समाजाला न्याय मिळून देण्याचे कार्य आमचे बाकी आहे. ज्याचे सरकार येईल, त्या सरकारविरोधात लढण्याची मराठा समाजाची तयारी आहे. त्यामुळे मराठाच मुख्यमंत्री व्हावा, याच्याशी आमचा संबंध नाही, असे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.