राज्यसभेत काँग्रेस खासदार सिंघवींच्या आसनाखाली सापडले नोटांचे बंडल:राजकारण तापले, चौकशीपूर्वी नाव घेणे चुकीचे, काँग्रेस, सत्य समोर यावे- भाजप
शुक्रवारी राज्यसभेत चलनी नोटांचे बंडल सापडल्यानंतर राजकारण चांगलेच तापले अाहे. सभापती जगदीप धनखड यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले की, बुधवारी सुरक्षा तपासणीदरम्यान खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना वाटप केलेल्या सीट क्रमांक २२२ खालून नोटांचे एक बंडल सापडले. धनखड म्हणाले की, ५०० रुपयांच्या १०० नोटांचे बंडल सापडल्याची बाब समोर आल्यानंतर मी चौकशीचे आदेश दिले आहेत. नोटांचे बंडल सभागृहात कसे आले याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असे भाजप खासदारांनी म्हटले. त्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सभापतींनी चौकशी करूनच खासदाराचे नाव घ्यावे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, खासदाराचे नाव घेणे चुकीचे नाही. सत्य बाहेर यावे म्हणून चौकशीचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर याच मुद्द्यावरून पुन्हा गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. …मग काेणी गांजा ठेवून जाईल, मी संसदेत फक्त ५०० नोट आणतो: सिंघवी : काँग्रेस खासदार सिंघवी म्हणाले की, हा सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा आहे. खासदारांच्या आसनांवर काटेरी तारा लावाव्यात किंवा काचेचे कडे लावावे. खासदारांनीही आसनांना कुलूप लावून जावे. नाहीतर इथे कुणी गांजा ठेवेल आणि निघून जाईल. सिंघवी म्हणाले- असो, मी संसदेत फक्त पाचशे रुपयांची नोट आणत असतो. मी गुरुवारी दुपारी १२:५७ वाजता राज्यसभेत आलो आणि तीन मिनिटे वाट पाहिल्यानंतर दुपारी १ वाजता कॅन्टीनमध्ये गेलो. अर्धा तास तिथे राहिल्यानंतर मी संसदेतून बाहेर पडलो. सिंघवी म्हणाले – नोटांचे बंडल सापडणे हस्यास्पद आहे. मी चौकशीसाठी तयार आहे. गड्डी सापडणे ही गंभीर बाब, काँग्रेसने चौकशी करू द्यावी- नड्डा राज्यसभेतील सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले की, नोटांचे बंडल सापडणे ही गंभीर बाब आहे. काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करू द्यावी. अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी तपासाला परवानगी द्यावी, असे नड्डा यांनी खरगे यांना सांगितले. त्यावर खरगे म्हणाले, तपासाला आमचा कधीच विरोध नाही. लोकसभा : अदानी मुद्द्यावरून कामकाज तहकूब दुसरीकडे, अदानी प्रकरणावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी-अदानी भाई-भाईच्या घोषणा देत काळे मुखवटे घालून संसद परिसरात निषेध मोर्चा काढला. शून्य प्रहरात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस व अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यात संबंध असल्याचा आरोप केला. सरकार, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.