राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे:त्यांनी काय करायचे ते देवेंद्र फडणवीस हेच ठरवतात; संजय राऊत यांचा निशाणा
राज ठाकरे यांना खेळवले जात आहे. राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे झाले असल्याचे आता दिसत आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्याप्रमाणेच भूमिका घेत आहेत, हे आता स्पष्ट झाले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काय करायचे हे देखील देवेंद्र फडणवीस हे ठरवत असल्याचे राऊत म्हणाले. या माध्यमातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असून यावरुन राऊत यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपला शरण गेले नाहीत. त्यांची संपत्ती मुक्त केली नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, अजित पवार यांची 1000 कोटी रुपयांची संपत्ती सुटली आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचे आम्ही अभिनंदन करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. काही दिवसातच नवाब मलिक यांची संपत्ती देखील मुक्त केली जाईल, असा देखील दावा राऊत यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती दाऊदशी संबंधित होती. त्यामुळे जप्त करण्यात आली होती. ती देखील भाजपासोबत गेल्यानंतर आठव्या दिवशी मुक्त करण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. माझे स्वतःचे मुंबईतील राहते घर, माझी वडीलोपार्जीत शेती देखील अद्याप त्यांच्या ताब्यात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. संपत्ती जप्त केल्यानंतर अजित पवार यांना त्यांचे वडिलांसमान असलेले काका शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खूपसावा लागला. मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र महाराष्ट्रातील इतर नेत्यांची संपत्ती देखील जप्त केली आहे. त्या देखील मोकळा करा, मात्र त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी भीतीपोटी पक्ष सोडला असल्याची टिका देखील संजय राऊत यांनी केली आहे. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता. मात्र मी पक्ष सोडला नाही. त्यामुळे माझ्यावर करावायी करण्याच्या आधीच माझे मुंबईतील राहते घर जप्त केले असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.