केज येथील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण:संतप्त जमावाने एसटी बस पेटवली, मनोज जरांगे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथे अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मागील नऊ तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास या रास्ता आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. पोलिस आणि आंदोलन आमने-सामने आले होते. सरपंचांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग गाव गाठत कुटुंबियांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी फोनवरून संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मस्साजोग गावच्या सरपंचाच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. सुजाण आणि चांगल्या जनतेला वेठीस धरण्याचे, त्रास देण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. देशमुखांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता.केज) आणि महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी ता.धारुर) अशी आरोपींची नावे आहेत. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून इतर आरोपींची माहिती घेण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. नेमके काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी 3 वाजता, केजहून (एम. एच. 44 बी. 3032) कारने गावाकडे निघाले होते. गावातील शिवराज देशमुख हा त्यांची कार चालवत होता. डोणगाव फाट्याच्या पुढील टोलनाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या लाइनमधून कार जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ (एम. एच. 44 झेड. 9333) आडवी लावली. स्कॉर्पिओतून उतरलेल्या सहा हल्लेखोरांपैकी एकाने कारच्या दरवाज्याची काच दगडाने फोडली. नंतर कारच्या डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांना खाली ओढून काठीने मारहाण केली. त्यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून अपहरण केले. ही जीप सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) यांची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुदर्शन घुले व इतर 5 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल होता.