दिल्लीत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल:उद्या शपथविधी शक्य, राजभवनावर तयारी सुरू, मंत्र्यांच्या संख्येबाबत संभ्रम
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आठवडा उलटून गेला असला तरीही राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अजून ठरवायची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर दुसरीकडे, बहुतेक शनिवार, १४ रोजी विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राज्याच्या राजशिष्टाचार विभागाला १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी करण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याप्रमाणे राजभवनावर तयारीसुद्धा सुरू केली आहे. परंतु मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही बुधवारपासून दिल्लीतच आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तर तत्पूर्वी, बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि ज्येष्ठ नेते बी.एल.संतोष यांची भेट घेऊन संभाव्य मंत्र्यांच्या नावावर चर्चा केली. संभाव्य नावे निश्चित केली असून त्यावर अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीचा निरोप घेऊन चंद्रशेखर बावनकुळे वर्षावर मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमित शाह यांच्यासोबत खातेवाटपाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर बावनकुळे तातडीने मुंबईत दाखल झाले. गुरुवारी रात्री ७ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन अमित शाह यांचा निरोप पोहोचवला. गुरुवारी रात्री ७ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न बावनकुळे यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तारीख तुम्ही ठरवली, आमची ठरायची आहे : देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच पंतप्रधान मोदींना भेटले. या भेटीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मोदींना भेट दिली. त्यानंतर दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विस्ताराची तारीख तुम्ही ठरवली आहे, पण आमची अजून ठरायची आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून तो लवकरच तुम्हाला कळेल, असे फडणवीस म्हणाले.