नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही:बावनकुळे यांचा पलटवार; भाजपसाठी हिंदुत्ववाद राजकारण नव्हे तर श्रध्दा, प्राण आणि श्वास असल्याचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरुन मोदींवर निशाणा साधला होता. त्यावरुन बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर काही तरी भूमिका घ्यावी. भाजपचे हिंदुत्व हे केवळ मतापुरते मर्यादित आहे का?, हिंदूंना घाबरुन मते घ्यायची एवढंच त्यांना जमते. बांगलादेशासह मुंबईतही मंदिर सेफ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बांगलादेशातील गोर-गरीब हिंदूंवर अत्याचार होत आहे. मुंबईतील दादरमधील हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहेत, आता भाजपचे हिंदुंत्व कुठे गेले? हिंदुंच्या मतावर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नेमके काय म्हणाले बावनकुळे ते देखील पहा…. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली. बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती. भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही, यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला विश्र्वगुरू पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही.