दादर स्थानकबाहेरील हनुमान मंदिर प्रकरण तापले:भाजप नेते किरीट सोमय्यांनी पाठवले रेल्वे प्रशासनाला पत्र, तातडीने नोटीस मागे घेण्याची केली मागणी

दादर स्थानकबाहेरील हनुमान मंदिर प्रकरण तापले:भाजप नेते किरीट सोमय्यांनी पाठवले रेल्वे प्रशासनाला पत्र, तातडीने नोटीस मागे घेण्याची केली मागणी

मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे. हे मंदिर गेल्या 80 वर्षांपासून इथे आहे. हे मंदिर पाडण्यासाठी नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले असून, ही नोटीस मागे घेण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, ADEN (वर्क्स) भायखळा, केंद्र रेल्वे अभियंता यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी दादर पूर्व येथील हनुमान मंदिराच्या विश्वस्त/पुजारी यांना अनधिकृत हनुमान मंदिर सात दिवसांच्या आत हटवण्यास सांगितल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. या पाडकामासाठी अधिकारी फक्त कॅगच्या अहवालाचा संदर्भ देत आहेत. पुढे किरीट सोमय्या म्हणाले, या मुद्द्यावर अधिकाऱ्यांनी ‘ॲप्लिकेशन ऑफ माइंड’ हे मूलभूत तत्त्व लागू केले नाही, याचा आम्हाला त्रास झाला आहे. दादर पूर्व, मध्य रेल्वे मार्गे प्रवास करणारे लाखो लोक आणि MMR क्षेत्राची 1.5 कोटींहून अधिक लोकसंख्या श्रद्धेच्या भावनेने या हनुमान मंदिराकडे पाहतात. माझ्या जन्मापासून मी सुद्धा या मंदिराकडे श्रद्धेच्या भावनेने पाहतो. अचानक, रेल्वेने हे मंदिर सात दिवसांत पाडण्याची नोटीस बजावली, ही केवळ धक्कादायकच नाही तर त्रासदायकही आहे, मी चौकशी केली आहे की मंदिरामुळे अडचण निर्माण होईल असा या भागात कोणताही मोठा प्रकल्प येत नाहीये. त्यामुळे मध्य रेल्वे प्राधिकरणाने ही नोटीस तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हल्ले होत आहेत. त्यासंदर्भात मोदी सरकार काय पावले उचलत आहे? यासाठी आमच्या खासदारांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु ती मिळाली नाही. दुसरीकडे मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर 80 वर्षांपासून जुने हनुमानाचे मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर आहे. त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे. मग कुठे आहे तुमचे हिंदुत्व?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच महायुतीला विचारला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment