संघ मुख्यालयापुढे EVM चे मंदिर बांधा:संजय राऊत यांचा BJP वर घणाघात; नागपूर अधिवेशनात एखादा स्फोट होण्याची शंका व्यक्त
राज्यातली स्थिती बिकट आहे. राज्याला आरोग्य मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही. राज्यात रस्त्यावर खून पडत आहेत. आणि असे असताना राज्याचा राजा हा उत्सवात मग्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्याऐवजी भाजपने ईव्हीएम मशीनची मिरवणूक काढावी आणि नागपूर मधील संघ मुख्यालयासमोर ईव्हीएमचे मोठे मंदिर उभारावे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीला महिना झाला तरी राज्यात अजूनही सरकार नाही. बहुमत असलेले सरकार जर राज्य चालवत नसेल तर या राज्याचे काय होणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कोणाला मंत्री करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तीन पक्षाचे लोकच एकमेकांच्या विरोधातील फाईली आणून देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर अशा फाईली आणून देण्याचे काम सुरू झाले असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला. त्यामुळे नागपूर येथील अधिवेशनाच एखादा स्फोट होऊ शकतो, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार हे सध्या स्वतः गडबडलेले दिसत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. हिम्मत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या हिंदुत्वाचा सातबारा भाजपच्या नावावर कोणी केला? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. या लोकांना हिंदुत्व शिकवले कोणी? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा बोट धरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मार्गावर आणले. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मुळात आमचे हिंदुत्व हे मतदानासाठी नाही. तर हिंदुत्व आमचे जीवन असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हिंदुत्वासाठी कुदळ – फावडे घेऊन निघण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. जर भाजपमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती दादर येथील 80 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हमालांनी मंदिर बांधले होते. तेव्हापासून कोणतेही अडचणी आला नाही. हा मजुरांचा देव आहे. हा संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता तिथे महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे आणि मी आणि स्थानिक आमदार महेश सावंत तसेच हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी महाआरती करणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली. भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर हिंदू म्हणून तर त्यांनी देखील आरतीला यावे. त्यांच्या हातात आम्ही गदा आणि घंटा देऊ. मात्र त्यांना हिंदुत्व कळत नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. मलाईदार खाते हवे, त्यातच नेते मग्न या राज्यात आरोग्य मंत्रीच नाहीत. जे होते त्यांच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एक महिना झाला तरी राज्याला आरोग्य मंत्री नाही. स्वतःला मलाईदार खाते हवे असल्यामुळे त्यातच ते मग्न आहेत. आणि दुसरीकडे मराठवाड्यातील महिला शास्त्रक्रिया झाल्यानंतर रस्त्यावर थंडीत पडलेल्या असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या प्रकारावरून राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.