मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत नाराजीनाट्य:मंत्रिपद न मिळाल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उपनेते पदाचा राजीनामा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना शिंदे गटात नाराजी पाहायला मिळत आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज होत भोंडेकर यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार होण्यास काही वेळातच सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी महायुतीच्या शिवसेना पक्षात नाराजी नाट्य दिसून आले आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद मिळाले नसल्याने पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळाला नव्हता, तसेच रामगिरी या शासकीय निवसस्थानाचे गेट देखील त्यांच्यासाठी उघडण्यात आले नसल्याच्या बातम्या तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र भोंडेकर यांनी हे वृत्त संपूर्णतः फेटाळून लावले होते तसेच दहा मिनिटांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी कॉल करून बोलावले असल्याचे त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आरपीआयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. आठवले म्हणाले, जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझे बोलणे झाले होते. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सांगितले होते. आता मी दोन दिवसांत पुन्हा दिल्लीत जाणार आहे. तेव्हा त्यांच्याशी पुन्हा या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.