मंत्रिमंडळात अजूनही एक जागा रिक्त?:जयंत पाटलांबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा; अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा वाढली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रिक्त ठेवण्यात आलेल्या एका मंत्र्याची जागा ही जयंत पाटील यांच्यासाठीच असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा पक्ष देखील आता अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानंतर या चर्चेला आणखीनच जोर आला आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात देखील मंत्रीपदाची एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. ही जागा जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आली असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता जयंत पाटील यांच्याबाबत अधिक चर्चा सुरू झाल्या आहेत. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यावेळी देखील एक मंत्री पद रिक्त ठेवण्यात आले होते. ते देखील जयंत पाटील यांच्यासाठी होते. मात्र, त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात विजय मिळाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी त्यावेळी देखील निर्णय घेतला नाही. मात्र, आता अशी परिस्थिती आहे की, एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्याकरता योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि लवकरच ते योग्य निर्णय घेतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. खेळामध्ये ज्या प्रमाणे वन डाऊनला एखादा खेळाडू येतो, त्या पद्धतीने वन डाऊनसाठी एक मंत्रीपदाची जागा रिक्त ठेवली असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. जयंत पाटील काय भूमिका घेणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील अजित पवार यांच्यासोबत महायुती सोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र या चर्चेला पूर्णविराम देण्याचे काम जयंत पाटील यांनी केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा जयंत पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता जयंत पाटील काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.