सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू निषेधार्थ महाराष्ट्र बंद:पोलिसांची अमानुष मारहाण, कठोर कारवाई करण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू निषेधार्थ महाराष्ट्र बंद:पोलिसांची अमानुष मारहाण, कठोर कारवाई करण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना 10 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. एका माथेफिरूने हे कृत्य केले होते व पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक देखील केली. मात्र त्याच दिवशी सायंकाळी उशिरा मोठा जमाव पुतळा परिसरात जमा झाला तसेच काही भागात दगदफेकीच्या घटना सुद्धा घडल्या. यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला होता. मात्र बंदला हिंसक वळण आले. 11 डिसेंबर रोजी परभणी शहराच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने शहरातील बाजारपेठांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यात अनेकांना अटक करण्यात आली. या अटक झालेल्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नामक व्यक्ती होता. ज्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि यामुळे आंबेडकरी अनुयायांनी आज दिनांक 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पोलिसांवर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी
या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संबंधित प्रकरणातील पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पक्षाने आज राज्यभर आंदोलन देखील पुकारले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे देखील माजलगाव बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या बंदला माजलगाव शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले.दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सर्व अनुयायांनी एकत्रित होत सदरील मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, सोमनाथ सूर्यवंशी हा लॉच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, याला इतकी बेदम मारहाण केली गेली की याची मारहाण अक्षरशः जणू याच्यावर एखाद्या धारदार शस्त्राने वार केले आहेत. अशा पद्धतीची मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्यानंतर त्याचा बळी जात असेल भलेही तो एमसीआरमध्ये मेला, त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला. पण त्याला पोलिस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे. चेंबूरमधील आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले
आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या या बंदला मुंबईतील चेंबूरमधील आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानतंर चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु होते. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्षातर्फे मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दहिसरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परभणीच्या घटनेबाबत आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते दहिसरमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेसह औसा आणि मुरुड येथील बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहे. तसेच एसटी बस आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. आंबेडकर अनुयायी संघटनेकडून शहरातील बससेवा, शाळा, महाविद्यालये सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. उमरगा येथील आंबेडकर आनुयायी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निषेधांचे निवेदन देखील देण्यात येणार आहे. तर परभणी प्रकरणाचे पडसाद सोलापूरातही उमटताना दिसत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment