संतोष देशमुखांच्या खूनप्रकरणी आम्हाला न्याय हवाय!:खासदार सोनवणे यांनी संसदेत उठवला आवाज, म्हणाले – बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही

संतोष देशमुखांच्या खूनप्रकरणी आम्हाला न्याय हवाय!:खासदार सोनवणे यांनी संसदेत उठवला आवाज, म्हणाले – बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे लोकसभेत आवाज उठवला. बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नसून एका सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली. बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तसेच हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचाही आग्रह धरला होता. याबाबत बजरंग सोनवणे यांनी आज लोकसभेतही आवाज उठवला. काय म्हणाले बजरंग सोनवणे?
संतोष देशमुख यांच्या क्रूर खूनप्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी आज संसदेत मांडली. माझ्या मतदारसंघातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत आहोत. संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे. ही माझी सभागृहाला विनंती आहे, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. संदीप क्षीरसागरांनीही अधिवेशनात मांडली भूमिका
खासदार बजरंग सोनवणे यांनी आज सरपंच हत्याप्रकरणी लोकसभेत आवाज उठवला. तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपली भूमिका मांडली. अतिशय दुर्दैवी घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडली आहे. यामधील काही गुन्हेगारांना तर अटकच झालेली नाही. ज्यांना अटक झाली ते प्रमुख गुन्हेगार नाहीत. यांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे तपासची अशी दिशाभूल केली जात असल्याचे क्षीरसागर म्हणाले. कसे झाले होते संतोष देशमुखांचे अपहरण?
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक काही दिवसांपूर्वी चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ 2 वाहनांतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार रोखली. त्यांना काठीने बेदम मारहाण केली. त्यांनंतर त्यांना बळजबरीने आपल्या गाडीत बसून केजच्या दिशेने नेले. याविषयी केज पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पण काही तासांतच बोरगाव – दहीटना मार्गावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कराड, चाटेवर खंडणीचा गुन्हा
मस्साजोग खून प्रकरणात आरोप झालेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्साजोग येथील सुनील केदू शिंदे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पवनचक्कीचे काम सुरू ठेवायचे असेल, तर दोन कोटी रुपये द्या, अशी धमकी फोनवरून आणि परळीच्या कार्यालयात बोलावून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास CID कडे, PSIचे निलंबन
विरोधकांनी यासंबंधी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेषतः या प्रकरणी केज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment