आदित्य ठाकरेंनी सुचवला 2025 साठी नवा संकल्प:माझा पक्ष तुमच्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा राहील, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

आदित्य ठाकरेंनी सुचवला 2025 साठी नवा संकल्प:माझा पक्ष तुमच्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा राहील, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी 2025 साठी नवा संकल्प केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवत मागणी केली आहे. राजकीय पोस्टर्स, बनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध लावण्यात यावा, राज्यभरात हा निर्णय लागू करावा, अशी मागणीच त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच यात माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा राहील, असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे की, आपण 2025 मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत. आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. ह्यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. त्यामुळे, मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यादिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. पुढे आदित्य ठाकरे म्हणतात, आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा राहील, असेही आदित्य यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून पत्रात म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment