देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई:अत्याधिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करू, विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबईमध्ये अभिनेता सैफ आली खानवर घरात घुसून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवरून मुंबई असुरक्षित असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या घटनेवरून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सैफ आली खानवर झालेल्या हल्याबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. या हल्ल्यामागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील त्यांनी सांगितले आहे, ते कुठून आले या सगळ्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरे आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतले पाहिजे. पण, तेव्हा त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे यासाठी योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण, अत्याधिक सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खान यांच्यावर हल्ला प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी सैफ अली खान यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्याकडून कसून तपास करण्यात येत आहे.